इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे पुणे येथे आयोजित तीन दिवसीय ४५ व्या अधिवेशनासाठी आलेल्या जपान येथील १६ सदस्यीय शिष्टमंडळाने कराड पालिकेस भेट दिली. त्यांनतर शनिवार पेठेतील नवीन जलशुध्दीकरण केंद्र, नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची कामे, पुरातन नकटय़ा रावळयाची विहीर, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाला भेट देऊन शिष्टमंडळाने माहिती घेतली.
शिष्टमंडळाचे स्वागत  नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे यांनी केले. महसुली उत्पन्न न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रगत असलेले जपानी तंत्रज्ञान पुरवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आश्वासन जपानच्या शिष्टमंडळाने कराड पालिकेच्या या सदिच्छा भेटीप्रसंगी दिले.
गोवा येथील प्रकल्प संचालक व येथील रहिवासी डॉ. आनंद वाचासुंदर यांच्या पुढाकाराने या शिष्टमंडळाने येथे भेट दिली. प्रास्ताविकात  जल अभियंता विजय तेवरे यांनी पालिकेसह पाणी योजनेची माहिती दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता एस. वाय. बसुगडे यांनी चित्रफितीद्वारे शहरात सध्या सुरू असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती दिली. या वेळी त्यांनी पाणीपुरवठय़ावेळी वाया जाणारे पाणी, महसुलाची आकारणी न होणारे पाणी याबाबत माहिती दिली. त्या वेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी जपान येथे महसूल न मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाच टक्के असून, ते देशात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगितले. आधुनिक जपानी तंत्रज्ञान पुरवून ते प्रमाण कशा पध्दतीने कमी करता येईल यादृष्टीने चर्चा केली. शिष्टमंडळासमेवत आलेल्या अश्विनी शिलेदार यांनी तर पालिकेतर्फे येथील योगेश्वरी हर्डीकर यांनी दुभाषी म्हणून काम पाहिले. पालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, मुख्याधिकारी हेमंत निकम, नगरअभियंता ए. एन. मुल्ला  यांच्यासह दोन्ही आघाडय़ांचे पदाधिकारी, नगरसेवकांची उपस्थिती होती.