मेडिकल, मेयो व आयसोलेशन रुग्णालयात १५ दिवसांत २०० वर रुग्णांवर उपचार
पावसाळा सुरू होताच शहरात गॅस्ट्रो, कावीळ, हिवताप, डेंग्यू आणि हिपॅटायटीस या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या पंधरा दिवसात मेडिकलसह मेयो आणि महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात गॅस्ट्रोचे १६० रुग्ण आढळले. डेंग्यूचे आतापर्यंत ३५ नमूने पाठविण्यात आले असून त्यापैकी १० पॉझिटिव्ह आले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गेल्या सहा महिन्यात डेंग्यूचे ४ आणि हिवतापाच्या ४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासूनच या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील विविध भागात रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. महापालिकेने आतापर्यंत ३५ नमूने पाठविले असून त्यापैकी १० जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेडिकलच्या बाह्य़रुग्ण विभागात गेल्या तीन महिन्यात ४०० पेक्षा अधिक गॅॅस्ट्रोच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जूनमध्ये २१० तर जुलै महिन्यात आतापर्यंत ७९ गॅस्ट्रो आणि  हिवतापाच्या सहा रुग्णांची तपासणी करण्यात आली. गेल्या पाच महिन्यात आयसोलेशन रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात गॅस्ट्रोच्या १ हजार ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यातील बहुतेक रुग्ण शहरातील झोपडपट्टी भागातील असल्याचे निदर्शनास आले आहे. मधल्या काळात काविळीच्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर गॅस्ट्रो आणि हिवताप या साथींचेही रुग्ण शहराच्या वेगवेगळ्या भागात आढळले आहे.
शहरातील विविध भागातील दरुगधीच्या ठिकाणी रोज फवारणी केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात असला तरी तरी प्रत्यक्षात फवारणी होताना दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. शहरात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खोलगट भागात पाणी साचलेले आहे. त्यामुळे  डासांची संख्या वाढली आहे. शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक अनेक उपाय करतात, पण पाहिजे तेवढा परिणाम जाणवत नाही. जिल्ह्य़ातील काही तालुक्यांमध्ये आणि शहरात पाऊस होत असल्यामुळे  अनेक भागांतील रस्त्यावर किंवा खड्डय़ांमध्ये पाणी साचले आहे. हीच ठिकाणे डासांच्या उत्पत्तीसाठी आदर्श ठरत असल्यामुळे प्रादुर्भाव वाढला आहे. दोन दिवसापूर्वी एकाचा मृत्यू झाला. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे यांनी सांगितले. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्येही हिवतापाचे रुग्ण दाखल आहेत. गॅस्ट्रोमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.