* लहान मुलांमध्ये कांजिण्यांची साथ
* ताप, सर्दी, अंगदुखीने मुंबईकर हैराण
* ‘व्हायरल इन्फेक्शन’ने अनेकजण आजारी ही काळजी घ्या
जुलाब, उलटय़ा यासारख्या आजारांमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सतत साखर-पाणी घेत राहणे हा घरगुती उपाय आहे. ताप अथवा व्हायरल इन्फेक्शन असल्यास शक्यतो घरी विश्रांती घ्या, ताजे आणि गरम अन्न खा, बाहेरचे तेलकट, तळलेले आणि उघडय़ावरील पदार्थ टाळा, उकळलेले पाणी प्या आणि आजारी पडल्यानंतर दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांकडे जा.

अगोदर थंडी, मग अंगाची काहिली, मग थंडी, उकाडा आणि पुन्हा थंडी अशा हवामानाच्या ‘लहरी’पणामुळे मुंबईकर बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटका लहान मुलांना बसला आहे. मुंबईत अनेक भागांत कांजिण्यांची साथ फैलावली आहे.
सध्या तापमानात दर आठ-पंधरा दिवसांनी बदल होत आहे. कधी कडक उन्हाळा तर पुन्हा कडाक्याची थंडी असे बदल होत आहेत.  हेच बदल वरील आजारांना कारणीभूत ठरतात. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लहान मुलांना किंवा मोठय़ांनाही त्याची लागण पटकन होते, असे डॉक्टरांचे निदान आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये कांजिण्या, सर्दी-खोकला, जंतुसंसर्ग, अंगदुखी अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्याची रीघ सुरू झाली आहे.
बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले की, थंडी गेल्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कांजिण्यांची साथ आली आहे. ज्यांना लहानपणी कांजिण्या आलेल्या नाहीत आणि ज्यांनी याची लस टोचून घेतलेली नाही, अशा मोठय़ा माणसांनाही कांजिण्या होत आहेत. हवामानबदलामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी आणि लगेचच तेवढाच कडक उन्हाळा असे विचित्र हवामान लागोपाठ काही दिवसांच्या अंतराने निर्माण झाल्याने, कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना या बदलाशी जुळवून घेता येत नाही, परिणामी आजार बळावतात. सध्याचे आजार हवेच्या माध्यमातून नव्हे, तर केवळ संसर्गामुळे पसरत आहेत. सर्वसाधारणपणे ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी अशा तक्रारी तीन ते पाच दिवस राहतात. लहान मुले आणि मोठी माणसेदेखील यामुळे हैराण आहेत. योग्य औषधोपचारामुळे हळूहळू ही लक्षणे कमी होऊन बरे वाटते. अशी लक्षणे दिसली तर दुखणे अंगावर काढू नका डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घ्या, असे आवाहनही डॉ. केळकर यांनी केले.
अंधेरी (प.) येथील डॉ. सुभाष बेंद्रे यांनीही हेच निदान नोंदविले. ते म्हणाले की, घशामध्ये खवखव, शिंका, घशात दुखणे, कोरडा खोकला, अंगात कणकण अशा तक्रारी सुमारे ६० टक्के आहेत. नाक, स्वरयंत्र आणि घसा या भागात जीवाणूंचा संसर्ग झाल्याने या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आम्हालाही मास्क लावून काम करावे लागत आहे.