‘जागतिक पुस्तक दिन हा पुस्तक खरेदी दिन आणि वाचन दिन व्हावा’ असे जाहीर आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एकीकडे केले असतानाच दुसरीकडे ‘पुस्तक दिन’ हा विषय राज्य शासनाच्या चर्नीरोड येथील ग्रंथविक्री दालनाच्या गावीही नसल्याचे चित्र बुधवारी दुपारी ग्रंथविक्री दालन/ग्रंथागार येथे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तावडे यांनी राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याचीही घोषणा केली होती. २३ एप्रिल रोजी साजरा होत असलेल्या जागतिक पुस्तक दिनाच्या पाश्र्वभूमीवर चर्नीरोडच्या ग्रंथागारात कोणतेही उत्सवी वातावरण पाहायला मिळाले नाही. पुस्तक दिनाच्या निमित्ताने येथे साधा फलक किंवा भीत्तिपत्रकही लावण्यात आलेले नव्हते.  
जागतिक पुस्तक दिन हा दिवस अन्य सणांप्रमाणे ‘उत्सव दिन’ म्हणून साजरा केला जावा, आधुनिक काळाची ती गरज आहे. या दिवशी प्रत्येक मराठी नागरिकाने किमान एक तरी पुस्तक खरेदी करावे, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. मात्र तावडे यांचे हे आवाहन शासकीय ग्रंथविक्री दालनापर्यंत पोहोचले नसल्याचे चित्र बुधवारी दुपारी येथे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य विश्वकोश मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांकडून प्रकाशित केली जाणारी पुस्तके चर्नीरोड येथील शासकीय ग्रंथदालनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शासकीय पुस्तकांच्या किमती खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांच्या तुलनेत कमी असल्याने चोखंदळ वाचक, साहित्यप्रेमी, अभ्यासक यांची शासकीय ग्रंथदालनात नेहमीच वर्दळ असते.
पुस्तक दिनाच्या निमित्ताने येथे वातावरणनिर्मिती केली असेल, पुस्तकांचे महत्त्व सांगणारे फलक, भीत्तिपत्रके लावली असतील, अशी साहित्यप्रेमींची अपेक्षा होती. मात्र बुधवारी या शासकीय ग्रंथदालनास भेट देणाऱ्या साहित्यप्रेमींची घोर निराशा झाली. त्याचे कारणही ‘सरकारी’ होते. प्रकाशनांच्या २०१४-१५च्या वार्षिक संग्रह मोजणी (भांडार पडताळणी)निमित्त शासकीय ग्रंथागार १ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत बंद राहील, अशी नोटीस येथे लावण्यात आली होती. पुस्तक दिनाच्या संदर्भातील कोणतेही उत्सवी वातावरण येथे नव्हते. पुस्तक खरेदी आणि पुस्तकांबाबत चौकशी करण्यासाठी येणाऱ्या वाचकांना ग्रंथदालनात पाऊल टाकण्यासही मज्जाव करण्यात आला होता. आत जाऊ का? असे कोणी विचारले तर प्रवेशद्वारावर बसलेला पोलीस हवालदार या नोटिसीकडे बोट दाखवून तुम्ही उद्या या, असे निर्विकारपणे सांगत होता.
वार्षिक संग्रह मोजणीसाठी ग्रंथागार इतके दिवस बंद ठेवण्याची खरोखरच गरज आहे का, लांबून पुस्तकांची खरेदी करण्यासाठी येथे आलेल्या ग्रंथप्रेमींची गैरसोय होत आहे, याची जाणीव संबंधिताना नाही का, येणाऱ्या लोकांना किमान ग्रंथागारात प्रवेश देऊन प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांची सूची उपलब्ध करून देणे, पुस्तक दिनाच्या निमित्ताने शासनाने प्रकाशित केलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देणारे, पुस्तकांचे आणि वाचनाचे महत्त्व सांगणारे फलक लावणे, विश्वकोश आणि अन्य पुस्तकांची मुखपृष्ठे असलेले माऊनबोर्ड किंवा फलक उभे करणे इतक्या साध्या गोष्टीतूनही जागतिक पुस्तक दिनाची वातावरणनिर्मिती येथे करता आली असती. पण तसे काहीही झाले नसल्याबद्दलची खंत साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाने प्रकाशित केलेली पुस्तके अपवाद वगळता खासगी पुस्तक विक्रेत्यांकडे मिळत नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा अन्य अपवाद वगळता या पुस्तकांची ठोस विक्री करण्यासाठी किंवा ही पुस्तके वाचकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी शासकीय ग्रंथागाराकडूनही आक्रमक उपाययोजना केल्या जात नाहीत. त्या पाश्र्वभूमीवर जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली होती. मात्र अनुत्साही वातावरणामुळे शासनाने प्रकाशित केलेली अनेक चांगली पुस्तके केवळ या ग्रंथागारापुरतीच मर्यादित राहिली आहेत. ती वाचकांपर्यंत कधी पोहोचणार? याच्या प्रतीक्षेत साहित्यप्रेमी आहेत.