गेल्या तीन महिन्यांपासून सत्तापक्ष नेत्याचे नाव गुलदस्यात ठेवण्यात आल्यानंतर अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची नुकतीच या पदावर निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीवरून आता स्पर्धेत असलेल्या पक्षाच्या अन्य सदस्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे.  
प्रवीण दटके यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर आठ दिवसांत सत्तापक्ष नेत्याची निवड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी सत्तापक्ष नेत्याची निवड करण्यात आली नव्हती. संदीप जोशी, गिरीश देशमुख, सुनील अग्रवाल, दयाशंकर तिवारी आणि अविनाश ठाकरे यांची नावे स्पर्धेत होती. मात्र, एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तापक्ष नेत्यांची निवड होईल असे वाटत असताना त्यानंतर महापालिकेची महासभा सत्तापक्ष नेत्याविना झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
भाजपमधील अंतर्गत वादामुळे सत्तापक्ष नेत्याचे नाव जाहीर केले जात नाही, अशी चर्चा होती. मधल्या काळात संदीप जोशी आणि गिरीश देशमुख यांची नावे चर्चेत असताना ती दोन्ही नावे मागे पडली आणि ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल व दयाशंकर तिवारी यांची नावे समोर आली.
दयाशंकर तिवारी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तर अग्रवाल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. सुनील अग्रवाल यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती होती. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेच्यावेळी अग्रवाल यांचे नाव जाहीर करतील अशी अपेक्षा होती. . पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये अग्रवाल यांच्या नावावर एकमत होत नसल्यामुळे पुन्हा एकदा सत्तापक्ष नेत्याची निवड लांबणीवर पडली आणि अखेर नव्या वर्षांच्या प्रारंभी संसदीय मंडळाने दयाशंकर तिवारी यांचे नाव शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी निश्चित केल्यानंतर महापौर प्रवीण दटके,  पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि आमदारांच्या उपस्थित तिवारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यावेळी स्पर्धेत असलेले सुनील अग्रवाल, संदीप जोशी हे सदस्य अनुपस्थित होते. संदीप जोशी, अविनाश ठाकरे आणि सुनील अग्रवाल हे देवेंद्र फडणवीस यांचे तर गिरीश देशमुख आणि दयाशंकर तिवारी हे सदस्य नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
दावेदार असलेले सर्व सदस्य आपापल्यापरीने गॉडफादरच्या माध्यमातून प्रयत्न करीत असताना गडकरी समर्थक असलेले दयाशंकर तिवारी यांची अखेर सत्तापक्ष नेतेपदी वर्णी लागली आहे.
कोणीही नाराज नाही – दटके
या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांनी सांगितले, सत्तापक्ष नेत्याची निवड ही संसदीय मंडळाने केली असल्यामुळे कोणाचीही नाराजी नाही. अग्रवाल काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही. दयाशंकर तिवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी महापालिकेत विविध पदे भूषविली आहेत. सत्तापक्ष नेत्यासाठी इतका वेळ का लागला याचे उत्तर शहर अध्यक्ष देऊ शकतील. अग्रवाल ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी असल्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे दटके म्हणाले.