माजलगाव शहरात वादग्रस्त बांधकाम असलेल्या इमारतींची जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी स्वत: बुधवारी पाहणी केली. या वेळी नागरिकांशी थेट संवाद साधून प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. अधिकार नसताना गुंठेवारी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून ‘बीओटी’ तत्त्वावरील गाडय़ांचे करार रद्द करण्याचे आदेश बजावले. दरम्यान, केंद्रेकर यांच्या या दबंगगिरीने तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा गडबडून गेली.
सकाळीच माजलगाव शहरात दाखल झालेल्या जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन वादग्रस्त सव्र्हे नं. ७१ व ७२मधील जमीन प्रकरणाच्या संचिकांबाबत चर्चा केली. फाईल गायब झाली तरी गुन्हेगार सुटत नसतात, अशा शब्दांत संबंधितांची कानउघडणी केली. त्यानंतर संभाजी चौकात धडक मारून रस्त्यावरील अतिक्रमणे व वीज खांबांची विल्हेवाट असलेल्या कामाची पाहणी केली. काही ठिकाणचे खांब काढून टाकण्याची सूचना केली. शहरातील वादग्रस्त दोन इमारतींची पाहणी करून नगरपालिकेकडे मोर्चा वळवला. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ‘बीओटी’ तत्त्वावरील गाडय़ांबाबत विस्ताराने माहिती घेत संचिका तपासून हा करार रद्द करण्याचे आदेश बजावले. याबरोबरच अधिकार नसताना गुंठेवारी करणाऱ्या पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश बजावले. यानंतर केंद्रेकर यांनी थेट रस्त्यावर नागरिकांशी सार्वजनिक समस्यांबाबत संवाद साधत जागेवर समस्या सोडवण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दबंग भ्रमणाने यंत्रणा गडबडून गेली.