करवीर तालुक्याचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांवर विभाजन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोरेवाडी (ता.करवीर) येथे बोलताना दिली. या गावातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्याची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले, यामुळे प्रशासनावर ताण पडत चालला आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण असे तालुके केले जाऊन नागरिकांची कामे लवकर होण्याकडे कटाक्ष आहे.
मोरेवाडी गावामध्ये १ कोटी रुपयांची विकासकामे सुरू झाली असल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ सेवासंघासाठी ५ लाख रुपयांचा निधी दिला. गावातील शासकीय जागेत अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा वास्कर, सरपंच अमर मोरे, उपसरपंच ऊर्मिला लाड, पंचायत समिती सदस्य स्मिता गवळी, माजी सरपंच मनोहर गुरव यांच्यासह शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.