दिवाळी म्हटली की आनंद, उत्साहाची पर्वणी. याचा गोडवा, माधुर्य वाढविण्यासाठी, मनामनांतील अंधकार नाहीसा व्हावा, प्रकाशरूपी आनंद मिळावा, या हेतूने संत रंगनाथ रंगमंदिरात यंदाही ‘नक्षत्रांचे गाणे’ या पाडव्याच्या संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला.
‘प्रभाती सूर नभी रंगती’ या गाण्याने उत्तरा केळकर यांनी या मैफलीत रंग भरण्यास सुरुवात केली. कलाकारांनीही हातचे न राखता दिलखुलास गप्पांमधून कार्यक्रमाची रंगत वाढविली. उत्तरा केळकर व रवींद्र साठे यांनी एकाहून एक सरस गाणी गाऊन रसिकांची वाहवा मिळविली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी खुसखुशीत शैलीत कलाकारांना बोलते केले. अनुभवाचे गाठोडे सोडत आठवणींची शिदोरी रसिकांसमोर उलगडली. त्याचा रसिकांनीही मनमुराद आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या दिवशी उत्तरा केळकर यांचा वाढदिवस होता. उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या. रवींद्र साठे यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने सांगता केली.
नियोजित वेळेच्या (सकाळी सहा) आधीपासूनच सभागृह तुडुंब भरले होते. वाढती गर्दी पाहून सभागृहाबाहेर मोकळय़ा जागेत स्क्रीनची व्यवस्था करून कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध केली होती. तरीही उशिरा आलेल्या रसिकांना जागेअभावी परत जावे लागले. आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.