आंतरजातीय विवाह केल्यामुळे जातिनिर्मूलनास मदतच होणार आहे. परंतु हे विवाह डोळसपणे व काहीतरी चांगले ध्येय उराशी बाळगून व्हायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रतिलाल व चंदाबेन जरीवाला यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार म. य. ऊर्फ बाबा दळवी यांच्या स्मरणार्थ विजयेंद्र काबरा सभागृहात आंतरजातीय विवाहितांचा सत्कार सोहळा बाबा दळवी विचारमंचातर्फे आयोजित केला होता. याप्रसंगी जरीवाला दाम्पत्य बोलत होते. या दोघांचा ७० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. आता रतिलाल जरीवाला ९६ वर्षांचे, तर चंदाबेन यांचे वय ९० आहे. हे दोघेही या निमित्ताने आपल्या गतकाळातल्या आठवणींत रममाण झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे-जाधव होत्या. समाजकल्याण समितीचे सभापती रामनाथ चोरमले यांनी ‘आंतरजातीय विवाहितांसाठी जिल्हा परिषद सेसमधून घरकुल योजना राबविण्याबद्दल विचार करता येईल’ असे जाहीर केले.
माजी न्या. डी. आर. शेळके म्हणाले, की,जातीअंताच्या दिशेने पाऊल टाकणारे आंतरजातीय विवाह करणारे तरुण आजचे खरे क्रांतिकारक आहेत, परंतु त्यांना कठीण प्रसंगातून जावे लागते. नोकरी नसेल तर त्यांच्या वैवाहिक जीवनात अस्थैर्य निर्माण होते. त्यामुळे त्यांना सरकारी, निमसरकारी नोकरीत किमान पाच टक्के आरक्षण दिले जावे. याप्रसंगी २५ जोडप्यांना गौरव प्रमाणपत्र व गृहोपयोगी भांडी देऊन सत्कार करण्यात आला.
विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष स. सो. खंडाळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अंजली चिंचोलीकर व सदाशिव ब्राह्मणे यांनी केले.