लोकसेवा समितीच्या वतीने येथील जोंधळे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कोकण महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कुळीथाच्या पीठापासून सुक्या बांगडय़ापर्यंत विविध प्रकारच्या खास कोकणी खाद्य पदार्थाची रेलचेल या निमित्ताने भरविण्यात आलेल्या बाजारपेठेत होती. त्याचप्रमाणे कोकणी पद्धतीचे शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणही महोत्सवात उपलब्ध होते.
या महोत्सवात महिला संगीत भजन स्पर्धा, विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, मालवणी भाषेतील विनोदी नाटक,  दशावताराचा पारंपरिक खेळ, गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्टच्या अध्यक्षा जयंती भालचंद्र पाटकर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. गणपत गावडे आणि सुधाकर आंगणे यांना सामाजिक कार्यकर्ता तर शशिकांत देसाई यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. स्मिता बागवे, पूजा शेलार, दर्शना परब, प्राची देसाई यांना उत्कृष्ट कोरियोग्राफर म्हणून गौरविण्यात आले. अखिल भारतीय कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष दिलीप कुडाळकर, सुभाष परुळेकर, ‘फू बाई फू’ फेम भालचंद्र कदम, डॉ. राजाराम दळवी आदी मान्यवरांनी महोत्सवास भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत सुर्वे यांनी तर विष्णू सकपाळ यांनी आभार मानले.