शहरात ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला खेटून उभारण्यात आलेल्या डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़ संकुलाच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात तत्कालीन नगर भूमापन  अधिकारी कृष्णात कणसे व तत्कालीन परिरक्षण भूमापक डी. आर. शिंदे या दोघांना दोषी धरून तातडीने निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे पाठविला आहे.
याप्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कायदा चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे जिल्हा निमंत्रक विद्याधर दोशी यांना याबाबतचे लेखी पत्र निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पाठविले असून त्यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याविरूध्द कारवाईच्या शिफारशीची माहिती नमूद आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे गुरू असलेले डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मरणार्थ नाटय़ संकुलाची उभारणी करण्यासाठी भुईकोट किल्ल्यालगतच मूळ राज्य शासनाच्या मालकीचा भूखंड सोलापूर महापालिकेने शासनाची मान्यता न घेताच डॉ. फडकुले प्रतिष्ठानला परस्पर खरेदी देऊन टाकला होता. नाटय़संकुलाची उभारणी करतानाही पुरातत्त्व वास्तू संरक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप विद्याधर दोशी यांनी केला होता. अगोदर नाटय़संकुलाची उभारणी व नंतर केंद्र शासनाच्या पुरातत्त्व वास्तू संरक्षण विभागाकडून परवानगी असा प्रकार घडला असताना त्याविरोधात विद्याधर दोशी यांनी सातत्याने पाठपुरावा चालविला असता त्यात भूखंड खरेदी-विक्रीतील आक्षेपार्ह बाबदेखील समोर आली. याप्रकरणाची चौकशी भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांनी केली. यात या भूखंडाची नोंद करणारे तत्कालीन नगर भूमापन अधिकारी कणसे व परिरक्षण भूमापक मोरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. या चौकशीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे.