चारित्र्याचा संशय घेऊन तसेच माहेराहून पैसे व सोन्याचे दागिने आणत नाही म्हणून सासरी होणाऱ्या छळास कंटाळून डॉक्टर पत्नीने आपल्या दीड वर्षांच्या तान्हुल्या मुलीसह आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या डॉक्टर पतीला अटक झाली असून त्यास १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. विजापूर रस्त्यावरील सैफुल परिसरात वैष्णवीनगरात हा प्रकार घडला.
डॉ. स्मिता ऊर्फ कांचन चन्नबसप्पा केसगौड (वय २७) व त्यांची मुलगी चिन्मयी अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. डॉ. स्मिता हिने घरात मुलीसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात दोघी मायलेकी शंभर टक्के भाजून जागीच मरण पावल्या. पती डॉ. चन्नबसप्प्पा यास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. मृत डॉ. स्मिता व तिचा पती डॉ. चन्नबसप्पा यांच्यात विवाहापूर्वी व विवाहानंतरचे संबंध कसे होते, त्यांच्यात नेमका कोणता वाद होता, घरात रॉकेल कोठून आले, या घटनेत अन्य नातेवाईकांचा संबंध होता काय, घटनेपूर्वी दोघा पती-पत्नीमध्ये मोबाईलवरून कोणते संभाषण झाले, आदी मुद्यांवर तपास करायचा असल्याने पोलीस तपास अधिकाऱ्यांनी आरोपीसाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. या वेळी आरोपीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत डॉ. स्मिता हिचा विवाह २३ नोव्हेंबर २०१० रोजी झाला होता. दोघेही एमबीबीएस. डॉ.चन्नबसप्पा हा शेजारच्या कर्नाटकात सिंदगी (जि. विजापूर) येथे वैद्यकीय व्यवसाय करतो, तर डॉ. स्मिता सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात सेवेत होत्या. मुलगी लहान असल्याने डॉ. स्मिता अलीकडे काही महिन्यांपासून रुग्णालयात जात नव्हत्या. परंतु माहेरातून पैसे व सोन्याचे दागिने आणत नाही म्हणून डॉ. चन्नबसप्पा हा पत्नीचा छळ करीत असे. तसेच चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे वैतागून डॉ. स्मिता यांनी आपल्या मुलीसह आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले.