प्रखर उन्हाळ्याने असह्य़ झालेल्या नागपूरला गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. नागपूर शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक झोपडपट्टी भागासह काही वस्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्यामुळे आणि विविध भागात झाडे पडल्यामुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. झोपडपट्टी भागातील अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरल्याने लोकांना महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले.
आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाच्या सरी कोसळतील असे वातावरण निर्माण झाले असताना सकाळी आठच्या सुमारास जवळपास एक तास दमदार पाऊस झाला त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच चारांबळ उडाली. दही बाजार, शाहू मोहल्ला, कावरापेठ, आसीनगर, कळमना, महाल या भागातील अनेक वस्त्यामध्ये पाणी साचले होते. गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्य़ात काही भागात पावसाची संततधार सुरू असून आज सकाळी वेगवेगळ्या भागात कमी-अधिक प्रमाणात आजही पाऊस सुरूच आहे. या पावसाने शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. महापालिकेने आपात्कालीन कक्ष सुरू केला असून त्या द्वारे शहरातील विविध भागात व्यवस्था केली जात आहे. हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड, वृंदावननगरनगरातील रेल्वे कॉलनी, व्हीआरसी कॉलेज, रामदासपेठ लेंड्रा पार्क या भागात झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. उंटखानामधील महिमा अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, जागनाथ बुधवारी, दक्षिणामूर्ती, कळमाना, पारडी, नंदनवन या भागातील विविध अपार्टमेंट आणि काही घरांमध्ये पाणी शिरले होते.
अग्निशामक विभागाच्या आपात्कालिन विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागात जाऊन अपार्टमेंट शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे काम करीत होते. शहरातील विविध कोसळलेली झाडे उचलण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
तालुक्याच्या बहुतांशी भागात आज दमदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने काही काळ उसंत घेतली होती मात्र तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला रिमझिम स्वरुपाच्या सरींनी नंतर चांगलाच जोर पकडला. शहरातील काही भागात रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहे त्यामुळे त्या भागात पाणी साचले आहे.
अर्धवट कामांमुळे वाहतुकीची कोंडी झाली. शहरात सकाळी दमदार पाऊस झाल्यानंतर दुपारी काही वेळ उन्हं होते मात्र साडेतीनच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. शहरातील नाल्या, गटारे यांची स्वच्छता करण्यात आल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला असला तरी आजच्या पावसामुळे सगळे दावे फोल ठरले. ग्रेट नाग रोड, नरेंद्रनगर, लोखंडीपुल., रेशीमबाग, नंदनवन, इतवारी, कळमना या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील अनेक रस्ते उखडलेले असून गटारे या पावसाच्या पाण्यानेही तुंबून गेले होते.
* जिल्ह्य़ात सर्वात जास्त पाऊस कळमेश्वर तालुक्यात झाला असून नदी व नाल्यांना पूर आले. पावसाने जिल्ह्य़ात मोठे नुकसान झालेले नाही. इतर तालुक्यांमध्ये नदी व नाल्यांना पूर गेले नसले तरी नाल्यांमध्ये पाणी साठले आहे. जिल्ह्य़ात शुक्रवारी १८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हिंगणा, काटोल, कन्हान, कामठी, रामटेक भागात साधारण पाऊस झाला. कोंढाळी भागात दुपारी १२ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. तासभर झालेल्या पावसाने नाल्यांना पाणी आले. कळमेश्वर तालुक्यात आतापर्यंत १३५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी सरीवर सरी कोसळल्या. तालुक्यात नदी व नाल्यांना पूर आले, पण मोठे नुकसान झालेले नाही. तालुक्यात कापसाच्या ८० टक्के पेरण्या आटोपल्या असून सोयाबीन पेरणीला सुरुवात झाली आहे. हिंगणा तालुक्यात सकाळी १० वाजताच्या सुमारास चांगला पाऊस झाला. जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाने शेतकऱ्यांचा कामाचा उत्साह वाढला आहे.