१९६४ साली नाटय़लेखक, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांच्या लेखणीतून उतरलेले ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक आजही नाटय़रसिकांच्या मनात घर करून आहे. जुनी दर्जेदार आणि गाजलेली नाटके आज क्वचितच प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्या काळी ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातून बाळ कोल्हटकरांनी वाईट संगतीमुळे वाया गेलेल्या तरुणाची कथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. ही कथा आजच्या काळातही तितकीच सुसंगत आहे असे वाटल्यानेच अभिनेता, दिग्दर्शक विजय गोखले यांनी हे नाटक नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. नाटय़दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांनी १९६४ साली हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आणले तेव्हा ते स्वत:, गणेश सोळंकी आणि अभिनेत्री आशा काळे यांनी त्यात काम केले होते. त्यानंतर १९८४ साली कोल्हटकरांच्याच दिग्दर्शनाखाली नाटक नव्याने रंगभूमीवर आले तेव्हा त्यात विजय गोखले आणि निवेदिता सराफ यांच्या भूमिका होत्या. कोल्हटकरांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकात त्यांच्याच दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे या नाटकाच्या प्रत्येक संवादामागची त्यांची भूमिका, या नाटकाचा अवाका आणि त्याचा आजच्या काळातील संदर्भ या सगळ्या गोष्टी मला पुरत्या माहीत होत्या आणि म्हणून मीच या नाटकाचे दिग्दर्शन करून ते नव्याने रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न केला, असे विजय गोखले यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. नव्याने रंगभूमीवर आलेल्या या नाटकात अभिनेता अंशुमान विचारे आणि शलाका पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘देव दीनाघरी धावला’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘नटसम्राट’ अशी किती तरी नाटके आज अजरामर झाली आहेत. ही जुनी नाटके पुन्हा पाहता यावीत, ही नाटय़वेडय़ांची नेहमीच इच्छा असते. या नाटकांमधून मांडलेले विषय आजही चिरंतन असल्याने ती आजच्या पिढीलाही आपलीशीच वाटतात, असे सांगणाऱ्या विजय गोखले यांनी त्या काळच्या नाटकांसाठी लिहिले गेलेले दर्जेदार संवाद आज कुठेही ऐकायला मिळत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली.