मोहरम उत्सवात ‘शहादत’ दिनानिमित्त शहरातील मुस्लिम पाच्छा पेठेतील दादापीर सवारीच्या  मिरवणुकीला सायंकाळी गालबोट लागले. यावेळी अचानकपणे दगडफेक होऊन त्यात एका दुकानासह जवळपास दहा वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पाच्छा पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जेलरोड पोलीस ठाण्याजवळ दादापीर सवारीची प्रतिष्ठापना हेमंत सपार यांच्या घराण्यामार्फत वंशपरंपरेने केली जाते. सोलापूरच्या मोहरम उत्सवाचे दादापीर सवारी म्हणजे खास वैशिष्टय़ मानले जाते. हिंदू समाजाकडून मोठय़ा भक्तिभावाने पूजल्या जाणाऱ्या दादापीर पंजाची मिरवणूक काल मोहरमच्या शहादतदिनी सायंकाळी निघाली असता पेंटर चौक ते जेलरोड पोलीस ठाण्यादरम्यान रस्त्यावर अचानकपणे गोंधळ झाला. घोषणा देण्यावरून आक्षेप घेतल्याने व पूर्ववैमनस्याच्या कारणावरून हा गोंधळ होऊन त्यात दगडफेक झाली. मात्र या दगडफेकीचे निश्चित अधिकृत कारण पोलिसांनाही समजू शकले नाही.
दरम्यान, या दगडफेकीत खाजाअमीन सैफनसाहेब बागवान यांची अ‍ॅपेरिक्षा, तसेच अमीन ताडपत्री यांची महिंद्रा जीवो, जावेद पटेल यांची रिक्षा, अफजान किड्स हे दुकान, टाटा आयशर, टेम्पो, सेंट्रो कार, मारूती कार व काही दुचाकी आदी वाहनांचे नुकसान झाले. खाजाअमीन बागवान यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.