‘‘‘मास एज्युकेशन’ची विसाव्या शतकातील संकल्पना आता वापरणे चुकीचे आहे. खुल्या शैक्षणिक स्रोतांवर आधारित शिक्षण हे एकविसाव्या शतकातील शिक्षणपद्धतीचे स्वरूप असायला हवे. एकत्रितपणे कल्पकता वापरून स्वत:चा विकास साधताना समाजाचाही विकास साधणे ही संकल्पना यात अभिप्रेत आहे,’’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त केले.
उगार खुर्द येथील ‘श्री हरी विद्यालया’च्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे रविवारी ‘रामतीर्थकर मास्तर स्मृती व्याख्यानमाले’त ‘नवयुगाचे शिक्षण : मेटॅ युनिव्हर्सिटी’ या विषयावर ताकवले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ज्येष्ठ शिक्षक विजय खोत यांचा ताकवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रफुल्ल शिरगांवकर या वेळी उपस्थित होते.
ताकवले म्हणाले, ‘‘शिक्षितांनी शिक्षणाचे स्रोत तयार करून ते सर्वासाठी खुले करणे ही मेटॅ युनिव्हर्सिटीची संकल्पना आहे.आपला प्रश्न सोडविण्यासाठी जे ज्ञान उपयोगी पडू शकेल ते निवडून त्याचा आशय समजून घेता येण्याची गरज या प्रकारच्या शिक्षणात आहे. शिक्षण प्रत्यक्ष जीवनाशी भिडणे हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे.  शिक्षण घेणे हा स्वत:ला घडविण्याचा एक ‘योग’ आहे. यात शिक्षकाची भूमिका ‘विद्यार्थ्यांला शिकण्यास मदत करणारा’ अशी असायला हवी.
आपण कुठे चांगली कामगिरी केली आणि कुठे कमी पडलो हे विद्यार्थ्यांने स्वत:च शोधायचे असते. कृतिशील शिकणे व शिकता- शिकता समाजासाठी उपयुक्त अशी निर्मितीही करणे हा विचार या शिक्षणपद्धतीमागे आहे. यासाठी शाळा, विद्यापीठ आणि समाज या तीन पातळ्यांवरील शिक्षणाची सांगड घालायला हवी. अशा प्रकारची नवीन मूल्याधारित, संस्कृतिप्रधान आणि निर्मितीप्रधान शिक्षणपद्धती निर्माण करणे आवश्यक आहे.’’
अमेरिकेत ही संकल्पना राबविण्यास सुरूवात झाली असून, भारतातही मेटॅ स्कूल व मेटॅ युनिव्हर्सिटीचा एक प्रकल्प येत आहे, असे ताकवले यांनी सांगितले. या प्रकल्पाची पूर्वतयारी येत्या २-४ महिन्यांत पूर्ण होईल असे ते म्हणाले.