लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधींना वेगवेगळ्या मार्गाने मतमोजणीच्या ठिकाणी येण्याची व्यवस्था, स्वतंत्र ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली गेली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक यंत्रणेवर विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केले.
मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या वेळी राजकीय पक्षांनी केंद्रांवर पालन करावयाच्या नियमावलीची माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी असे आवाहन पाटील यांनी केले. राजकीय पक्षांना १५ मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल. उमेदवारांची संख्या लक्षात घेता केंद्रात गर्दी होऊ शकते. यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना पुढील रांगेत, त्यानंतर राज्यस्तरावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि त्यामागील रांगेत अपक्ष व इतर पक्षांच्या प्रतिनिधींना थांबता येईल. मतमोजणी केंद्रावर येण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आला आहे. जेणेकरून कोणत्याही दोन राजकीय पक्षांचे उमेदवार, समर्थक समोरासमोर येणार नाहीत. तसेच त्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था उपरोक्त स्वतंत्र मार्गावर करण्यात आली आहे. केंद्रात भ्रमणध्वनी, गॅस लायटर तत्सम वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले जाईल. मतमोजणीदरम्यान निकाल इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर प्रदर्शित केला जाणार आहे. बैठकीस अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.