अभियांत्रिकीच्या पुनर्परीक्षार्थीना नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका दिल्याने नवाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे ‘इलिमेंट ऑफ इंजिनीअरिंग’ या विषयाची परीक्षा गुरुवारी रद्द करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील या अनागोंदीमुळे विद्यार्थी चिडले आहेत. या अनुषंगाने कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘झालेला प्रकार खरा आहे. मात्र, तो कोणामुळे घडला, हे अजून उघडकीस आले नाही. त्याची माहिती घ्यावी लागेल. मग कारवाई करू.’
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरविण्यातच घोटाळे करण्यात आले. ६ जूनपासून होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर विद्यार्थी चक्रावून गेले. जो अभ्यासक्रम शिकलाच नाही, तो मजकूर पाहून त्यांनी नियंत्रकांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या. या पूर्वी अभियांत्रिकीच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजलेले आहे. त्या प्रकरणात दोषींवर कारवाई झालेली नाही. परीक्षा विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजनाही अंमलबजावणीत आलेल्या नाहीत. अशा स्थितीत गुरुवारी नवाच गोंधळ घालून ठेवल्याने विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. या अनुषंगाने परीक्षा नियंत्रकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही.