जिल्ह्य़ाच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत अधिका-यांना दिली.
नियोजन भवनमध्ये समितीची सभा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. या आराखडय़ाच्या आधारे उपायांसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले. सभेस उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, तहसीलदार सी. वाय. डमाळे, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. एस. बी. राजुरकर, प्रकल्पाधिकारी खोसे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी माने, वनाधिकारी अ. या. यलजाळे तसेच कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रदूषण नियंत्रण विभाग जलप्रदूषणासंदर्भात गोदावरी नदीच्या काठावरील गावातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी, जलप्रदूषण टाळण्यासाठी त्याचा आराखडा तयार केला जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. वन विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी पर्यावरणदिन, वसुंधरादिन, जलसाक्षरतादिन, ओझोन संरक्षणदिन साजरे केले जाणार आहेत. उद्योग विभागानेही पर्यावरणाचा विचार करूनच उद्योगांना परवानगी द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते तयार करताना झाडे तोडली जातात, रस्ता तयार झाल्यानंतर विभागाने पुन्हा रस्त्यालगत वृक्षारोपण करावे, अशी सूचना करण्यात आली.