काल गुरुवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्य़ात ठिकठिकाणी वादळ व गारपिटीसह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या पावसात बुलढाणा शहरात वीज पडून समीरण मिलिंद देशपांडे या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाला, तर अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या रब्बी हंगामासह भाजीपाल्यांचे मळे, फळबागा, आंबा मोहोर व कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हा पाऊस दुष्काळात तेरावा महिना असल्यागत कसळला. त्याने फायद्यापेक्षा नुकसानच अधिक केले.
या जिल्ह्य़ात बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव, संग्रामपूर, मोताळा, मेहकर, मलकापूर, चिखली, उंद्री या परिसरात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह वादळी मुसळधार पाऊस झाला. गुरुवारची तिथी ही लग्न तिथी असल्याने गोरड मुहूर्तावरील विवाहात पाऊस विघ्न म्हणून अवतरला. त्यामुळे वऱ्हाडय़ांना त्रास सहन करावा लागला. बुलढाणा शहरात अवकाळी पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. जिल्ह्य़ात अगोदरच दुष्काळ आहे. दुष्काळामुळे खरीप व रब्बीची पिके हातची गेली आहेत. आता त्याचे गारपिटीसह आगमन झाल्याने उरल्यासुरल्या रब्बी उन्हाळी पिकांचे, पालेभाज्या व फळबागांच्या उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आंबा मोहोर गळून पडला असून कांद्यालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.