प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला येथील अखिल सभागृहात जिल्ह्य़ातील सुमारे १८०० सत्यसाई-भक्तांच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर हळवे यांनी उपस्थितांना समाजसेवेबद्दल आवाहन केले. याप्रसंगी मंचावर विभागीय सेवाधिकारी बी.एम.वाडेगावकर, सचिन पुराणिक व बी.एस.चौधरी होते.
प्रास्ताविक बी.एम.वाडेगावकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्य़ात सत्यसाई सेवा संघटनेकडून होणाऱ्या कार्याची माहिती देऊन सांगितले की, ‘कमकाझरी’ हे आदिवासीबहुल गाव, ‘निर्मलग्राम’ म्हणून उभारण्याकरिता संघटनेने दत्तक घेतले असून आतापर्यंत त्या गावात ३६ स्वच्छतागृहे उभी केली. जनावरांकरिता गोठे बांधून दिले. गावकऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून घेतली, तसेच वेळोवेळी स्वच्छतारक्षण, सेंद्रिय खत निर्मितीकरिता शिबिरे घेतली. संघटनेची ‘मेडिकेअर प्रोजेक्ट’अंतर्गत जिल्ह्य़ाकरिता मोबाईल व्हॅन असून जेथे वैद्यकीय सेवा बरोबर उपलब्ध नाही त्या गावात शिबिरे घेऊन रुग्णांची नि:शुल्क तपासणी घेऊन औषध दिले जाते. याकरिता लागणारा निधी साईभक्त स्वेच्छेने अर्पण करतात. जिल्ह्य़ात २२ गावात ५ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींकरिता मूल्यांवर आधारित बालविकास केंद्रे, तसेच जिल्ह्य़ात ४० गावात भजनकेंद्रे असून विविध धर्मपंथांचे लोक या भजन केंद्रांचा लाभ घेतात. प्राचार्य प्रभाकर हळवे म्हणाले, समाजातील गरजूंची, दीनदुबळ्यांची सेवा करीतच आपण भगवंताच्या निकट पोहोचू शकतो. या सेवेतून मिळणारा आनंद, सेवकांचे जीवन प्रफुल्लित करून जातो. त्यामुळे प्रत्येकाने सेवाधर्माचे आचरण करून आपले व्यक्तिमत्व घडवावे. अशा सेवाभावी लोकांमुळे पापभीरू, क्रियाशील व सदगुणी समाज उभा राहू शकतो. हे सांगतांना त्यांनी सत्यसाई सेवा संघटना उभारणीची प्रारंभापासूनची सविस्तर माहिती दिली. सचिन पुराणिक यांनी अध्यात्म, नामस्मरण जीवनाला कसे आधारभूत ठरते, त्यामुळे दुष्टप्रवृत्तीचा कसा विनाश होतो, याची अनेक उदाहरणे देत मेळाव्याचे प्रबोधन केले. मेळाव्याला अन्य अतिथी म्हणून प्रमुख उपस्थितात गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी देशकर, समाज कार्यकर्त्यां नलिनी कोरडे, विलास ढेंगे होते.