ग्राहकाची भविष्यातील तरतूद एलआयसीत न गुंतवता थेट अभिकर्त्यांने ती लाटण्याचा केलेला प्रयत्न जागरूक ग्राहकामुळे उघडकीस आला. जुने शहरात ज्ञानेश्वर नगरातील उषा पुरुषोत्तम शिंडोले (शर्मा) यांनी या संबंधी जुने शहर पोलिसात तक्रार करूनत ही बाब उघडकीस आणली.
या प्रकरणातील दोन विमा पॉलिसी बनावट असल्याचे एलआयसीच्या वरिष्ठ शाखा अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात ग्राहकाला कळविले. संबंधित अभिकर्त्यां विरोधात एलआयसीने पोलिसात तक्रार करण्याची गरज
असताना तसे होताना दिसत नाही. एलआयसी अभिकर्त्यांस पाठीशी घालत असल्याचा संशय बळावतो. अभिकर्त्यांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एलआयसीचे अकोल्यातील एक अभिकर्ता पंकज दिलीप निनोरे यांनी येथील उषा पुरुषोत्तम शिंडोले यांना एन्डोमेंट प्लस व जीवन वैभव या दोन पॉलिसी विकल्या. एन्डोमेंट प्लस ही सुमारे एक लाख रुपयांचा प्रिमियम असलेली पॉलिसी यंदा मार्च महिन्यात व जीवन वैभव ही पॉलिसी
सुमारे १ लाख ९९ हजार ९९५ रुपयांची आहे. ती जुलै महिन्यात काढण्यात आली होती. असे एकूण २ लाख ९९ हजार ९९५ ग्राहक उषा शिंडोले यांनी एलआयसीत भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून गुंतवले होते, पण गेल्या महिन्यात शिंडोले परिवारास त्यांच्या पॉलिसीबद्दल संशय आला.
त्यांनी यासंबंधी एलआयसीत चौकशी केली असता त्यांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. या प्रकरणात एलआयसीकडे रितसर तक्रार केली असता एलआयसीने या दोन पॉलिसी विभागामार्फत जारी केल्या नसल्याचे लेखी स्वरूपात ग्राहकाला कळविले आहे. त्यामुळे उषा शिंडोले यांनी पॉलिसीसाठी गुंतवलेली सुमारे तीन लाख रुपयांची रक्कम एलआयसीत भरलीच गेली नाही, हे आता स्पष्ट होते.
 अभिकर्त्यांने व एलआयसीच्या विमा अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचा आरोप उषा शिंडोले पोलिसात लेखी स्वरूपात केली. या सर्व प्रकरणात एलआयसीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची दाट शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात देण्यात आलेले पॉलिसीचे मुळ कागदपत्रे एलआयसीचे आहेत काय, याचा तपास करण्याची गरज आहे. तसे असल्यास ते विभागातून गहाळ कसे झाले व कोणी केले. तसेच विभागातील शिक्क्यांचा या प्रकरणात दुरुपयोग झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. पॉलिसीवर सही करणारे अधिकारी देखील बनावट असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी उषा शिंडोले यांनी लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी पोलिसांनी व एलआयसीच्या वरिष्ठांनी तात्काळ करण्याची गरज आहे.
 उषा शिंडोले यांची सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक अभिकर्त्यांने केली आहे. त्याची परतफेड अभिकर्त्यांने वैयक्तिकरित्या करण्याची गरज आहे. एलआयसीची बनावट पॉलिसी अभिकर्त्यांने विकली असताना या प्रकरणात एलआयसीने देखील अभिकर्ता विरोधात पोलिसात तक्रार देण्याची गरज होती, पण तसे झाले नाही.
त्यामुळे विभागातील वरिष्ठांचा या प्रकरणात सहभाग आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. याची देखील सखोल चौकशी एलआयसीच्या वरिष्ठांनी करण्याची गरज आहे.
एलआयसीची बनावट पॉलिसी विकणाऱ्या अभिकर्त्यांवर व त्याला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केल्यास एलआयसीची विश्वासार्हता वाढेल, असे मत इतर अभिकर्त्यांनी खाजगीत व्यक्त केले. या प्रकरणानंतर सर्व ग्राहकांनी त्यांच्या पॉलिसीची खातरजमा एलआयसीच्या कार्यालयात करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.