सोलापूर शहर व ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारनंतर मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्हय़ातील दुष्काळाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी खरीप पिकांच्या पेरण्यांच्या कामांना वेग आल्याचे दिसून येते.
काल गुरुवारी सायंकाळी शहर व जिल्हय़ात बहुसंख्य भागात पाऊस झाला होता. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पुन्हा पावसाला प्रारंभ झाला. सायंकाळी पुनश्च आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. अशा वातावरणामुळे दुष्काळी सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी व सामान्य जनतेला दिलासा मिळाला असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरची संख्या घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी शहर व जिल्हय़ात सर्वदूर पाऊस पडल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. शहर व परिसरासह उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी १७.१० मिली मीटर पाऊस झाला. तर माढा तालुक्यात २९.४० मिमी इतका दमदार पाऊस झाला. मोहोळ तालुक्यातही २६.२० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अक्कलकोट (११), पंढरपूर (९.३०), माळशिरस (४), बार्शी (२.६०) व मंगळवेढा (१) याप्रमाणे अन्य तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला.
आतापर्यंत जिल्हय़ात सरासरी ५३.२४ मिमी पाऊस झाला असून यात सर्वाधिक ८५.६० मिमी पाऊस टँकरग्रस्त माढा तालुक्यात पडला, तर त्या खालोखाल माळशिरस तालुक्यात ८१ मिमी इतका पाऊस झाला. अन्य तालुकानिहाय पडलेला पाऊस याप्रमाणे : उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर (प्रत्येकी ४९), बार्शी (२७), अक्कलकोट (४५), पंढरपूर (५८.७३), मंगळवेढा (३९.१३), सांगोला (५१.६०), मोहोळ (५३.४०) व करमाळा (४६).
रोहिणी नक्षत्राने चांगली साथ दिल्यानंतर जिल्हय़ात खरीप पिकांच्या पेरण्याची तयारी झाली होती. परंतु त्यानंतर मृग नक्षत्राच्या पावसाने म्हणावी तेवढी साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून वरुणराजाने कृपा केल्याने सर्वत्र पाऊस होत आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या वेगात सुरू झाल्याचे दिसून येते.