06 July 2020

News Flash

‘अवकाळी’चा शेतकऱ्यांना कोटय़वधींचा दणका

सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष, गहू, हरबरा, मका, कांदा या पिकांचे पुन्हा कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

| March 3, 2015 06:56 am

सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष, गहू, हरबरा, मका, कांदा या पिकांचे पुन्हा कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तयार झालेली द्राक्षे, तरारलेला गहू, बहरलेला आंब्याचा मोहोर यामुळे भरघोस उत्पन्नाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशांवर पावसाने अक्षरश: पाणी फेरले. तयार झालेली द्राक्षे बाजारात जाणार असताना हे संकट कोसळल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे. दुसरीकडे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना व्यक्त होत आहे. पावसाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसणार असल्याची भीती आहे. सोमवारी शहर व परिसरात सूर्यदर्शन झाले खरे तथापि, काही भागात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्याने अजून किती दिवस पावसाची ही टांगती तलवार कायम राहील, या भीतीने शेतकरी हबकला आहे.
वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात अडकला आहे. या नव्या संकटाने त्यात अधिकच भर टाकली. नाशिक, निफाड, येवला, कळवण, सटाणा, चांदवड, देवळा आदी तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा आढावा घेण्यास युध्दपातळीवर सुरूवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हजारो हेक्टरवरील पिके या पावसाने बाधीत झाली आहेत. त्यात द्राक्ष, गहू, हरभरा व मका आदी पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. बहुतांश ठिकाणी द्राक्षबागा तयार झाल्या असून पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. देवळा तालुक्यात गहू पिकाचे २५ टक्के नुकसान झाले. हरभरा, मका या पिकांचीही अशीच स्थिती आहे. कृषी विभागाच्या पहिल्या दिवशीच्या अंदाजानुसार ९५ गावांना पावसाचा फटका बसला. जवळपास १० हजार शेतकऱ्यांचे पाच हजार ६०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी पावसाच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली. येवला तालुक्यात पिकांसोबत आंबा बागांचे नुकसान झाले. बहरलेला मोहर ५० टक्क्याहून अधिक झडून गेल्याची माहिती आंबा उत्पादक अनिरुध्द पटेल यांनी दिली. येवल्याप्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी झाडावरील मोहर झडल्याचे दिसत आहे. नुकसानीचे आकडे वाढत असले तरी शासनाकडून काही मदत मिळेल किंवा नाही याची शेतकऱ्यांना धास्ती आहे. मागील पाच महिन्यात याच पध्दतीने नुकसान झालेल्यांची संख्या अधिक आहे. तथापि, त्यांना आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही.
सातत्याने तडाखा,
मदत मात्र नाही
अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणे दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या कालावधीत नैसर्गिक संकटाने सलग चार वेळा जिल्ह्यातील थोडय़ाथोडक्या नव्हे तर, ३२ हजार ५१९ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी १२३ कोटीहून अधिकची मदत अद्याप मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ७९ हजार ७९७ इतकी आहे. आधीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसताना पाठोपाठ एक संकट कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्यास सातत्याने अवकाळी पावसाचा तडाखा दिला आहे. पावसाळ्याचा हंगाम संपुष्टात आल्यापासून त्यास सुरुवात झाली. सप्टेंबर २०१४ मध्ये अवकाळी पावसाने १४ गावांमधील १८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांचा आकडा १०१६ पर्यंत होता. तेव्हा २४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. ऑक्टोबर २०१४ हा महिना नैसर्गिक संकटाला अपवाद राहिला नाही. त्यावेळी ५८ गावांत १९४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईपोटी दोन कोटी २० लाख रुपये द्यावयाचे होते. ही मदतही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३२ गावांतील ८४९९ हेक्टरवरील पिके बाधीत झाली. नुकसानीचा आकडा सुमारे १९ कोटी होता. या आपत्तीची झळ ३१ हजार ४०९ शेतकऱ्यांना सहन करावी लागली. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झाले. जिल्ह्यातील ३३२ गावांमधील २१,८९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. ४५ हजार ४३१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. या नुकसान भरपाईपोटी १०२ कोटी रुपये मदत मिळणे अपेक्षित होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा हे संकट कोसळले असले तरी आधीची मदत पदरात पडली नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मागील पाच महिन्यातील नुकसानीवर नजर टाकल्यास ७९ हजार ७९७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे सर्व नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना त्यात नवीन संकटाची भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:56 am

Web Title: farmers facing loss due to unexpected rain
टॅग Farmers
Next Stories
1 फवारणीच्या चक्रव्युहात द्राक्ष उत्पादक
2 दिवस आंदोलनांचा..
3 स्वाइन फ्लू स्थितीचा आढावा
Just Now!
X