खरीप हंगामासाठी बियाणांच्या खरेदीची लगबग वाढली असताना विदर्भात बनावट बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना प्रलोभने देऊन अप्रमाणित बियाणे विकण्याच्या प्रयत्नात वितरकांचे मोठे जाळे उभे केल्याचे निदर्शनास आले आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी या जाळ्यात अडकू लागले आहेत. विनापरवाना विक्री होत असलेल्या या बियाणांचा कोणताही लेखाजोखा नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
विदर्भात सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी केली जाणार आहे. पश्चिम विदर्भात सोयाबीन बियाणांची मागणी सर्वाधिक आहे. संकरित आणि सुधारित बियाणांच्या वापरात अमरावती विभाग राज्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी वितरकांच्या टोळ्या फिरत आहेत. काही कंपन्यांनी विनापरवाना बियाणे विक्रीसाठी बाजारात आणले आहे. बियाणांच्या उगवण क्षमतेविषयी आणि एकरी उत्पादनाविषयी मोठे दावे केले जात असल्याने आणि बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने शेतकरी या वितरकांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. अप्रमाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असतानाही कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन केले जात नसल्याने या वितरकांचे फावले आहे.
कापूस आणि सोयाबीन बियाणांची खरेदी विदर्भात मोठय़ा प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांना कृषी केंद्रांवर अनेक वेळा पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध होत नाही, अशा स्थितीत हे शेतकरी बोगस बियाणे कंपन्यांसाठी सावज ठरतात. अमरावती विभागात बीटी कापूस बियाणांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती अनेक वेळा दिली जाते. अमूक बियाणे वापरल्यास तणनाशक वापरण्याची गरज पडत नाही, असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तणनाशक वापरावे लागते. उशिरा उपाययोजना केल्यास उत्पादनक्षमता घटते, असा अनुभव आहे. गेल्या वर्षी देखील असेच प्रकार निदर्शनास आले होते.
कृषी विभागाने बियाणे विक्रीवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथके तयार केली आहेत. मात्र या भरारी पथकांनी कृषी केंद्रांवरच अधिक लक्ष केंद्रित केल्याने अप्रमाणित बियाणे विकणाऱ्यांच्या टोळ्या मोकाट आहेत. बोगस बियाणे कंपन्या शेतकऱ्यांना प्रलोभने देत आहेत. भाग्य सोडत आणि वस्तू स्वरूपात भेट देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्यात या कंपन्या आघाडीवर आहेत. कृषी विभागाने मुबलक बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले असले, तरी शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
सोयाबीन बियाणांचा काळाबाजार गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवायला मिळत आहे. सध्या एमआरपीपेक्षा कमी दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवले जात आहे. यात बियाणे सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने शेतकरी जाळ्यात अडकत चालले आहेत.
गेल्या वर्षी अमरावती जिल्ह्य़ातील काही भागात मुगाच्या अप्रमाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा मान्सून वेळेवर येईल, अशी शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बियाणांच्या खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत, पण शेतकऱ्यांना बियाणांच्या खरेदीविषयी स्थानिक पातळीवर माहिती उपलब्ध नसल्याने संभ्रम आहे. कोणते बियाणे किती प्रमाणात उपलब्ध आहे, याविषयी माहिती दिली जात नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांनी अप्रमाणित बियाणांपासून सावध राहावे, असा इशारा कृषी विभागाने दिला खरा, पण प्रमाणित बियाणांची उपलब्धता, त्यांची यादी आणि हवामानविषयक माहितीअभावी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.