ठाकुर्ली पूर्व भागात उड्डाणपुलाचा आराखडा तयार करताना म्हसोबानगर परिसरातील झोपडीपट्टीधारक व अन्य घर मालकांना पालिकेने अंधारात ठेवल्याने त्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडीवासीयांनी पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात सुमारे तीनशे झोपडपट्टीधारक सहभागी झाले आहेत. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून आपण म्हसोबानगर परिसरात राहतो. असे असताना पालिकेने आम्हाला उड्डाणपुलाची आखणी करताना नोटिसीद्वारे कळवून आमचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. परंतु, केवळ विकासकांची पाठराखण करणाऱ्या पालिकेने हेतूपुरस्सर आम्हाला वाऱ्यावर सोडविण्यासाठी आम्हाला अंधारात ठेवले. गुपचूपपणे आम्हाला बेघर करण्याचा पालिकेचा हा डाव आहे, असे झोपडपट्टीवासीयांनी सांगितले. या उड्डाणपुलास झोपडपट्टीवासीय कडाडून विरोध करतील, असा इशारा या उपोषणाच्या माध्यमातून नगरसेवक चौधरी यांना पालिकेला दिला.
या झोपडपट्टीत सुमारे दोनशे कुटुंब आणि दहा ते पंधरा हजार नागरिक राहत आहेत. रेल्वे आणि पालिका अधिकारी यांच्या संगनमताने या भागातील झोपडपट्टीवासीयांना बेघर करण्याचा डाव असल्याचा आरोप झोपडपट्टीवासीयांना केला आहे.
या प्रकरणामुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आयुक्त रामनाथ सोनवणे यांचीच असेल, असेही नगरसेवक चौधरी यांनी सांगितले.