आपल्याच १६ वर्षीय मुलीवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या वडिलांना आरे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो आपल्या मुलीवर बलात्कार करत होता.
 पीडित मुलगी ११ वीत असून आई, दोन सावत्र बहिणी आणि पित्यासह राहते. बुधवारी तिने आरे पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दिली. घरात कुणी नसताना धमकावून माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
हे जर कुणाला सांगितले तर महाविद्यालयाचा खर्च तसेच पुस्तक आणि कपडय़ांना पैसे देणार नाही असे ते धमकवायचे. त्यामुळे आपण हा प्रकार सहन करत होतो. एवढेच नव्हे तर अन्य दोन सावत्र बहिणींवरही आपले वडील बलात्कार करत होते, असे तिने पोलिसांना सांगितले.
आरे पोलिसांनी या मुलीच्या तक्रारीवरून तिच्या वडिलांच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक शोषण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.