शहरातील ८२ शाळा व महाविद्यालयातील जवळपास एक लाख विद्यार्थ्यांची वाहतूक एकटय़ा एसटी महामंडळामार्फत केली जाते. सकाळी व सायंकाळी बसला लटकून धोकादायक पध्दतीने प्रवास करणारे विद्यार्थी नेहमीच दिसतात. यावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी मध्यवस्तीतील शाळा व महाविद्यालयांना आपल्या वेळापत्रकात काहिसा बदल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळात काही बदल करून विद्यार्थ्यांचा प्रवास सुखद करण्याचा प्रयत्न होता. परंतु, या उपक्रमाला ४० पैकी केवळ सात ते आठ शाळा व महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला. उर्वरित शाळांनी आपल्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारीच न दर्शविल्याने हा उपक्रम अपयशी ठरला. सध्या खासगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतल्यास त्याचा भार एसटी महामंडळाला पेलता येणे अवघड आहे. कारण, सध्या उपलब्ध असणाऱ्या बसेसद्वारे आधी आहे, त्या विद्यार्थ्यांचा प्रवास कसा घडतो हे दररोज पहावयास मिळतो. शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहतूक सेवा बंद झाल्यास त्याचा निम्म्याहून अधिक भार एसटी महामंडळावर येऊ शकतो. त्यावेळी सध्याची अस्तित्वातील व्यवस्थाही कोलमडून पडण्याचा धोका आहे.