वरिष्ठाचा आदेश मिळताच छपरावर चढून कावळ्याचे प्राण वाचविण्यासाठी सरसावताना कोसळून मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलातील जवानाला पालिका अधिकाऱ्यांकडून न्याय मिळू न शकल्याने अखेर अभय अभियान ट्रस्टने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अग्निशमन दलातील जवानाला छपरावर चढण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यापासून अग्निशमन दलप्रमुखांनी सूचना करूनही या प्रकरणाची चौकशी लांबवून फाइल कायमचीच बंद करणाऱ्या पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वच जण पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
मशीद बंदर येथील तंबाखू गल्लीमधील विशाल वृक्षावर गुरफटलेल्या पतंगाच्या मांज्यात २ डिसेंबर २०१३ रोजी एक कावळा अडकला होता. या कावळ्याची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. झाडाजवळील गोडाऊनच्या छपरावर चढून कावळ्याची सुटका करण्याचे आदेश इंदिरा डॉक अग्निशमन केंद्रातील सहाय्यक अधिकारी मकरंद सुर्वे यांनी दिले. त्यानुसार उमेश परवते तात्काळ गोडाऊनच्या छपरावर चढले आणि छप्पर तुटल्यामुळे २० फूट उंचावरून खाली कोसळले. गंभीर जखमी झालेल्या उमेश यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर टेम्पोमधून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
गोडाऊनच्या छपराची काळजीपूर्वक पाहणी न करताच उमेश यांना त्यावर चढण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करीत अभय अभियान ट्रस्टच्या कविता सांगरुळकर यांनी या प्रकरणाची र्सवकष चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरूही झाली. मात्र चौकशीच्या अहवालाबाबत असमाधान व्यक्त करीत कविता सांगरुळकर यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी अग्निशमन दलप्रमुखांकडे केली होती. त्यांनीही पालिकेतील उपायुक्तांकडे फाइल पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी असे सूचित केले होते, परंतु तब्बल दोन महिने ही फाइल या अधिकाऱ्याच्या टेबलावर धूळ खात पडली होती. त्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून ही फाइल बंद करीत असल्याचा शेरा मारून, या अधिकाऱ्याने ती फाइल कायमचीच शीतपेटीत बंद केली. त्यामुळे अभय अभियान ट्रस्टने आता थेट डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेत मकरंद सुर्वे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मकरंद सुर्वे यांनी उमेश परवते यांना सिमेंटच्या पत्र्यापासून तयार केलेल्या छपरावर चढण्याचे आदेश दिले कसे. हा पत्रा तुटण्याची शक्यता त्यांच्या लक्षात कशी आली नाही. गोडाऊनजवळ उभी असलेली वाहने हटवून अग्निशमन दलाची शिडी उभारून कावळ्याचा प्राण वाचविता आला असता. पण वाहने हटविण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. मदतकार्याच्या वेळी दोरीचा वापर केला जातो. परंतु या घटनेत दोरीचा वापर झाल्याचे दिसत नाही. यावरून कावळ्याचे प्राण वाचविताना अग्निशामकांच्या सुरक्षेविषयी मकरंद सुर्वे यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी आपल्या जबानीत केला आहे.
मदतकार्यासाठी धाव घेताना सोबत रुग्णवाहिका घेऊन जाणे क्रमप्राप्त असते.
परंतु या घटनेच्या वेळी सोबत रुग्णवाहिका नसल्यामुळे उमेश यांना टेम्पोमधून रुग्णालयात न्यावे लागले, असेही त्यांनी जबानीत म्हटले आहे. उमेश यांच्या मृत्यूस अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे लवकरच सुर्वे आणि अन्य काही अधिकाऱ्यांची पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार आहे. परिणामी अधिकारी धास्तावले आहेत.