चालू रंगामात गळितास आलेल्या उसाला प्रतिटन २ हजार ५०१ रुपयांची पहिली उचल देण्याची घोषणा बहुचर्चित चांदापुरीच्या शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर यांनी केली. निरा खोऱ्यात ही सर्वाधिक पहिली उचल ठरत आहेत.
चांदापुरी ता. माळशिरस येथील हा साखर कारखाना गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने तो राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय होत होता. अखेर आज (रविवार) दि. २ डिसेंबर रोजी उडपीच्या पेजावर मठाचे श्री श्री विश्व प्रसन्नतीर्थ महाराज यांच्या हस्ते प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले होते. या वेळी या कारखान्यासाठी स्वत:च्या जमिनी तारण ठेवून कर्ज काढून देणाऱ्या सभासदांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपाध्यक्ष के. के. पाटील यांनी, कारखाना उभारणीसाठी गेल्या तब्बल १५ वर्षांत आलेल्या अडचणींचा पाढाच वाचला व या हंगामात पुरेल इतका ऊस कारखान्याकडे शिल्लक असल्याचे सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर यांनीही, संचालक मंडळावर इतकी वर्षे विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचे विशेष आभार मानून त्या सभासद शेकऱ्यांच्या हितासाठी आपण प्रयत्नशील राहू. आपण या कारखान्याचे मानधन तर सोडाच; अगदी चहाही घेणार नसल्याचे जाहीर केले. कार्यक्रमास उत्सुकतेपोटी सुमारे १० हजार लोक उपस्थित होते. डी. एल. पाटील यांनी आभार मानले.