राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित १६व्या क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर विद्यापीठाच्या पूजा पंडित आणि मंजित सिंग यांनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. दोन सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदके प्राप्त करून नागपूर विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पूजाने १०० मीटर धावण्याची शर्यत १३:२७ सेकंदात पूर्ण केली. मुंबई विद्यापीठाच्या चित्रा उचिल हिने १३:३५ मिनिटे वेळ घेऊन दुसरा तर मंजिरी रेवडे हिने १३:५२ एवढा वेळ घेऊन तिसरा क्रमांक पटकावला.
पूजा पंडित मूळची दिल्लीची असून ती धवड शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. पत्रकार परिषदेत डॉ. तायवाडे यांनी पत्रकारांच्या दबावापोटी उत्स्फूर्तपणे सुवर्णपदक विजेत्याला २० हजार रुपयांचे बक्षीस मिळवण्याविषयी पूजा फारशी गंभीर नव्हती. तिला त्याची शक्यताच वाटत नव्हती. म्हणूनच तिने ते मिळाले पोषक आहारावर त्याचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, नाही मिळाले तर आहे त्या परिस्थितीत खेळत राहील, असेही ती म्हणाली. यापूर्वी ती राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये धावली आहे.  एकूण ४२ पदकांमध्ये सर्वात जास्त पदके पुणे विद्यापीठाला मिळाली असून त्यात सात सुवर्ण, सहा रौप्य तर एक कांस्य अशी एकूण १४ पदके मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विद्यापीठ असून त्यांना पाच सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य अशी ११ पदके मिळाली आहे. नागपूर विद्यापीठाने आतापर्यंत आठ पदकांची कमाई केली आहे. त्यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाला दोन रौप्य, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला एक रजत, नांदेडच्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाला दोन कांस्य पदक आतापर्यंत मिळाले आहेत. इतर सर्व विद्यापीठांच्या तुलनेत अतिशय नवीन विद्यापीठ असलेल्या गोंडावाना विद्यापीठाने दोन दिवसात दोन कांस्य पदकांची कमाई केली हे विशेष. जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळवले आहे. व्यक्तिगत खेळ प्रकारांमध्ये पुणेविद्यापीठाचे नाव अग्रस्थानी असले तरी सांघिक खेळांमध्ये नागपूर विद्यापीठ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
आज कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉलमधील नागपूर विद्यापीठाची कामगिरी इतर विद्यापीठांच्या तुलनेत सरस ठरली.

लक्षवेधी
– महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात भक्ती आहुळकर तिच्या चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन कबड्डी खेळायला आली आहे. ती शिवाजी विद्यापीठाकडून खेळत आहे. ती १२व्या वर्षांपासून कबड्डी खेळत आहे.
– पुण्याचे कबड्डी प्रशिक्षक अनंत शेळके यांनी अनेक कबड्डीपटू घडवले आहेत. कबड्डीला वाहून घेतलेल्या शेळके यांनी चांगले कबड्डीपटू तयार करण्यासाठी सुवर्णयुग स्पोर्ट क्लब स्थापन केला    आहे.