शेवगाव तालुका नाटय़ परिषदेचे अध्यक्ष व तेथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांना पहिला पंडित सत्यदेव दुबे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्याच (दि.२५) पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पुण्यातील प्रसिद्ध नाटय़लेखक, अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांचे नाटय़गुरू सत्यदेव दुबे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला असून त्याचे पहिले मानकरी घेवरीकर ठरले आहेत. घेवरीकर हे गेली १५ वर्षे शेवगावसारख्या ग्रामीण तालुक्यात रंगकर्मी म्हणून विविध प्रयोग करत असतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी, हौशी रंगकर्मीसाठी अनेकविध उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत. आमदार चंद्रशेखर घुले, भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश भारदे, गोकुळप्रसाद दुबे, हरिष भारदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 3:23 am