नागरी भागात वानरे व मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असताना, डोंगरालगतच्या नागरी वस्तीत जंगली प्राण्यांची भक्ष्याच्या शोधार्थ घुसखोरी होऊ लागल्याने त्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे. आज पाटण तालुक्यातील वेगवेगळय़ा तीन घटनांमध्ये रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर, बिबटय़ाने थेट जनावरांचे गोठे लक्ष्य करून, एकूण पाच शेळय़ा ठार केल्या आहेत.
आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाल्मीकी पठारावरील निवी येथील अधिक साधू पाटील (वय ४५) हे रानगव्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ढेबेवाडी येथे प्रथमोचार केल्यानंतर त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गव्याने शिंग मारल्याने ते जखमी असून, त्यांच्या डोक्यालाही इजा झाल्याचे सांगण्यात आले. कृष्णा रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर ७ मध्ये न्युरो सर्जन त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास पाटण तालुक्यातील सोनाईचीवाडी येथील रवींद्र काळे व आनंद काळे यांच्या गोठय़ात घुसून बिबटय़ाने तीन शेळय़ा ठार केल्या तर, वरचे गोटील येथील रमेश अंतू पवार यांच्या दोन शेळय़ा बिबटय़ाने भक्ष्य केल्या आहेत.