जिल्ह्य़ात वाळू माफियांची मुजोरी वाढतच चालली असून धरणगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गस्ती पथकातील तलाठय़ालाच चिरडून टाकण्याच्या प्रयत्नाची त्यात भर पडल्याने महसूल यंत्रणा संतप्त झाली आहे. वाळू माफियांची ही दादागिरी संपविण्यासाठी आता गस्ती पथकात सशस्त्र पोलीस ताफा आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.
संपूर्ण जिल्ह्य़ात अनेक दिवसांपासून वाळू उत्खननावर बंदी आहे. तरीही सर्रासपणे नदी पात्रातून वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच असल्याने नदीकाठलगतच्या ग्रामस्थांनी ही चोरी रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणीही जुमानत नसल्याचे पाळधी पोलीस ठाण्यात वाळू माफियांनी घातलेल्या गोंधळाने स्पष्ट झाले आहे. शासनाकडून असे वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी नेमलेल्या गस्ती पथकातील तलाठी अनिल सुरवाडे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. जळगाव शहराच्या अगदी जवळच पाळधी गावालगत वैजनाथ या गिरणा नदीपात्रात हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. यात सुरवाडे हे जबर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी रिंगणगाव आणि कढोलीचे तलाठी सुरवाडे आणि नागदुलीचे तलाठी घनश्याम पाटील या दोघांचे पथक दुचाकीवरून वैजनाथ येथील गिरणा नदीपात्रात गेले असता काही ट्रॅक्टर्समध्ये त्यांना वाळू भरली जात असल्याचे दिसले. पाटील यांनी त्यातील एकाला पकडले तर सुरवाडे यांनी दुसऱ्या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला.
चालकाने सुरवाडे यांच्या अंगावरच ट्रॅक्टर घातला. जखमी झालेल्या सुरवाडे यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. धरणगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून रमेश सोनवणे आणि गुलाब मोरे यांना अटक करण्यात आली आहे.  सुरवाडे यांना चिरडण्याचा प्रयत्न करणारा ट्रॅक्टर मनसेचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येते. जळगाव शहरातील बरेच आजी-माजी नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी वाळू व्यावसायिकांशी संबंधित असून अवैध वाळू व्यवसायातून त्यांची दंडेली वाढत असल्याचे दिसून येते. जळगाव जिल्ह्य़ात यापूर्वीही चाळीसगाव तालुक्यात वाळू माफियांकडून तहसीलदाराचे वाहन पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. चाळीसगाव आणि अमळनेरात गस्ती पथकातील अधिकाऱ्यांवर हल्याचेही प्रकार बऱ्याचदा झाले आहेत.