जलसंवर्धनाच्या सामुदायिक चळवळीत अग्रणी असलेल्या सातपुडा फाऊंडेशनने स्वयंसेवी गावक ऱ्यांच्या साह्य़ाने तहानलेल्या वन्यप्राण्यांसाठी विविध व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील गावांनजीक बांधलेल्या शंभरावर बंधाऱ्यांनी जंगलातील पाण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने देशभरातील राज्यांना जलसंवर्धनाची नवी दिशा दाखविली आहे. या बंधाऱ्यांसाठी गावक ऱ्यांनी स्वत:हून श्रमदान करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली असून स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक गावांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखविला आहे.
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हजारो गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोंगणती भटकावे लागत आहे. जंगलातील पाणीसाठे आटल्याने वन्यप्राणी सैरभैर होऊन पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडू लागले आहे. मार्च संपताच ही स्थिती उद्भवली असून मान्सून पडेपर्यंत शिल्लक जलसाठे पुरवावे लागणार आहेत. या गंभीर परिस्थितीचे भान ठेवून पाण्याची साठवण करण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सातपुडा फाऊंडेशन गावकऱ्यांच्या मदतीने राबवित असून शेकडो बंधाऱ्यांच्या माध्यमातून जंगलातील मूक्या जीवांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. चंद्रपूर-अंधारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात डझनावारी बंधाऱ्यांमुळे वन्यजीव त्यावर तहान भागवत आहेत. सहसा उन्हाळ्याच्या दिवसात शिगेस पोहोचणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष यामुळे थोडाफार नियंत्रित राहणार आहे.
  महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या जंगलसमृद्ध मध्य प्रदेशातही गावक ऱ्यांना वनबंधाऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले जात असून त्याला गावकरी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
कान्हा, पेंच (कर्माझरी) आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने यासाठी योगदान दिले आहे. आतार्पयच या उपक्रमाच्या माध्यमातून शंभर वनबंधारे बांधण्यात आले असून यात पाण्याची साठवणही अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे. ताडोबातील वन्यप्राण्यांना तर बंधाऱ्यांमधून पाण्याचा नेहमीचा स्रोत उपलब्ध झाला आहे.
उन्हाळ्यात वन्यजीवांची पाण्यासाठी प्रचंड घालमेल होते. सर्वसाधारण निरीक्षणानुसार वन्यप्राणी चोवीस तासात एकदाच पाणी पितो. परंतु, तेही त्यांच्यासाठी उपलब्ध होत नाही. जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत, नद्या, ओढे, नाले ओढे आटले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातील तीन महिनेपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याने जंगलातील प्राण्यांना पाणी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. मात्र, प्रत्येक क्षेत्रात पाणी उपलब्ध करून देणे वन खात्याला शक्य नाही. तहानलेल्या प्राण्यांनी गावाच्या दिशेने धाव घेऊ नये, यासाठी गावाबाहेरील जंगलक्षेत्रात असे बंधारे आता अनिवार्य झाले आहेत.
उन्हाळ्यात शिकारीच्या घटनांतही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. जंगलाबाहेर पडणारे वन्यजीव आयतेच शिकाऱ्यांच्या सापळ्यात सापडतात. गावात शिरलेले हरिण, काळविट आणि छोटे तृणभक्षी प्राणी गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडतात. अशा घटना टाळण्यासाठी वन्यप्राण्यांना जंगलातच पाण्याची सोय करून दिल्यास यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. यातूनच सातपुडा फाऊंडेशनने २००९ साली हा उपक्रम हाती घेतला. यात गावकऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले तेव्हा गावकरी स्वत:हून श्रमदानासाठी तयार झाले. त्यांनी कोणताही मोबदला यासाठी घेतलेला नाही. गावात किंवा जंगलातच सहज उपलब्ध होणाऱ्या माती तसेच नदी किनाऱ्यावरील दगड, बारीक गिट्टी आणि वाळूचा यासाठी वापर करण्यात आला आहे.
जंगलातील प्राण्यांसाठी जलसंवर्धनाच्या प्रबळ संकल्पनेतून हा उपक्रम साकारला असून मातीचे बांध घालून अडविलेले पाणी वन्यजीवांना जीवनदान देत आहे. आता राज्यभरातील जंगलांमध्ये त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे, अशी माहिती सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर रिठे यांनी दिली.
जंगलप्रदेशातून वाहणाऱ्या ओढय़ा, नाल्यांचा प्रवाह वळवून बंधारे/चेकडॅम/स्टॉपडॅम/बोडीत पाणी साठविले जाते. यासाठी गावकरी विशेषत: शाळकरी मुले प्रचंड उत्साहाने श्रमदान करीत आहेत.

वनबंधाऱ्यांची गावे  
पेंच व्याघ्र प्रकल्प : घाटेपेंढरी, घोटी, वाघोली, झिनझरिया, खापा, सिल्लारी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : चोरगाव, देवडा, भाम्बेडी, आडेगाव, सीतारामपेठ, मुधोली, कटवाल, मोहर्ली
सातपुडा व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) : बिंदाखेड, मटकुली, अजंदना, मालनी, माना, पोदार, मल्लुपार, सुप्लाई, रायखेडा, साकई
कान्हा व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) : सौतिया, चापरी, पाटपारा, भागपूर
प्रियदर्शनी पेंच व्याघ्र प्रकल्प : तौरिया, आमझरी