बारावीची परीक्षा देण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडलेल्या बेपत्ता मुक्ता नादरे व अनसूया वाघमारे दोन मैत्रिणींचे मृतदेह शुक्रवारी पूर्णा नदीच्या बंधाऱ्यात सापडले. शनिवारी गिरगावात या दोन्ही मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन तरुण व दोन मुली अशा चौघांना ताब्यात घेतले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करून चौघा संशयितांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
या मुलींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी विजय कैलास कांबळे व शेख माजिद शेख या दोघांना आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, अन्य दोन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले. प्रकाश नांदरे यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस उपअधीक्षक माणिक पेरके यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी गिरगाव येथील चांदू वाघमारे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून त्यांची मुलगी अनसूया व मुक्ता नांदरे या दोघी मैत्रिणी असून, वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयात गुरुवारी बारावीची परीक्षा देण्याच्या नावाखाली घरातून बाहेर पडल्या. त्या रात्री परतल्या नाहीत. त्यामुळे त्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलीस तपास करीत असताना या दोघी मुलींना पोखर्णी येथील नृसिंह मंदिरात एका मुलासोबत आल्याचे चित्रीकरण मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यानुसार पोलीस पुढील तपास करीत असताना पोलिसांना पूर्णा नदीच्या बंधाऱ्यातील रहाटी शिवारात या दोन मैत्रिणींचे मृतदेह सापडले.
दरम्यान, या मुलींचे मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर या प्रकाराच्या निषेधार्थ शनिवारी गिरगावच्या ग्रामस्थांनी गावच्या जिजाऊ चौकात सर्वपक्षीय निषेध सभा घेतली.
 निषेध सभेनंतर रवी नांदरे, शंकर कऱ्हाळे व इतरांनी कुरुंदी पोलीस ठाण्यात आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. कुरुंदा पोलिसांनी या प्रकरणी विजय कैलास कांबळे व शेख माजिद शेख महमूद या दोघांसह दोन मुलींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा पोलिसांकडे वर्ग केला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पेरके यांनी दिली.