मृत्यूचे खोटे कारण दर्शवून विमा कंपनीची पावणेतीन लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी एका कुटुंबासह पाच आरोपींविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश विनायक शिंगणापुरे, राहुल डोमाजी वासनिक (रा. दयाळू सोसायटी जरीपटका), अनुप विनायक शिंगणापुरे, अजय विनायक शिंगणापुरे, रुपाली अनुप शिंगणापुरे, रोशनी अजय शिंगणापुरे (रा. जागृतनगर) ही आरोपींची नावे आहेत. ८ एप्रिल ते १७ जून २०११ दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी प्रकाश याच्याविरुद्ध त्याची पत्नी प्रणिता व मुलगी श्रेया या दोघींचा खून केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल असून या घटनेत तो जखमी झाल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी प्रकाशने त्याची पत्नी प्रणिता हिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्यासंबंधी खोटी कागदपत्रे आरोपी राहुल वासनिक याच्या मार्फत मिळविली. खोटी कागदपत्रे विमा कंपनीला सादर करून पॉलिसीचा २ लाख ७९ हजार ७६४ रुपयांचा धनादेश प्राप्त केला. तो धनादेश बँकेतील खात्यात जमा केला. त्यानंतर अनुप शिंगणापुरे व त्याची पत्नी रुपाली, अजय शिंगणापुरे व त्याची पत्नी रोशनी यांनी धनादेशांद्वारे ही रक्कम काढून घेतली.
चोरी करताना ताब्यात
कारमधील डेक चोरणारा बाल आरोपी सजग महिलेमुळे पकडला गेला. श्यामनगरातील जयहिंद सोसायटीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रमेश भाऊराव गुगल हे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. त्यांच्या भाडेकरू प्रिया त्रिलोक चव्हाण यादेखील रामेश्वरीला गेल्या होत्या. सायंकाळी त्या घरी परत आल्या. गुगल यांच्या घरामसोर उभ्या मारुती ८०० कारचे कुलूप तोडून त्यातील डेक (किं. ८ हजार रुपये) चोरताना एक मुलगा त्यांना दिसला. कारची इंधन टाकी त्याने फोडली. ते पाहूनप्रियाने आरडाओरड केली. तो बाल आरोपी मोटारसायकलने (एमएच/४०/व्ही/४६८३)े पळून जात होता. प्रियाची आरडाओरड एकून शेजारी सतर्क झाले. त्यांनी पळून जात असलेल्या आरोपीस पकडले व सोनेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मालकाला लुटणाऱ्यांना अटक
रामटेकजवळील प्रकाश कळमकर  या चिकन सेंटरच्या मालकाला लुटणाऱ्या पाच आरोपींना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याचा नोकरच टिपर निघाला. बंटी उर्फ भारत आनंद मंगलानी (रा. कामठी), आकाश बादल जांभुळकर (रा. रामटेक), शेख जाफर शेख मुजफर, रामदास राजेश देवांगण, फिरोज उर्फ राजा शेख (सर्व रा. कामठी) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शेख जाफर, रामदास देवांगण, फिरोज हे जबरी चोरी, घरफोडीचे अट्टल आरोपी आहेत.