स्थानिक पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ संमतीने खुलेआम सुरू असलेल्या दोन जुगार अड्डय़ांवर छापा टाकून सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पथकाने लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. शिवाजीनगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्याने जुगार सुरू होता. शहर विभागाचा अतिरिक्त कार्यभार आल्यानंतर पंकज देशमुख यांना या जुगाराची माहिती मिळाली. त्यांनी गुरुवारी रात्री गोकुळनगर व वर्कशॉप परिसरात जुगार अड्डय़ावर छापा टाकून लाखोचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्याने सुरू असलेल्या या जुगाराने अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते. स्थानिक पोलिसांना याची माहिती असूनही त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत होते. देशमुख यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.
दीड लाखाचे चंदन पकडले
सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रीच्या उद्देशाने चंदन बाळगणाऱ्या सहाजणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. लोहा तालुक्यातील मोकलेवाडी ते टेळकी रस्त्यावर एका झोपडीत धोंडीराम मोरे, परशुराम मोरे, परसु मोरे, मारोती गायकवाड (सर्व पारुनगर मुरूड, जिल्हा लातूर), शिवा लक्ष्मण जाधव व बापू मोरे (लातूर) हे चंदन बाळगून विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री छापा टाकून या सहाजणांना अटक केली.