गणपतीचे विसर्जन कृत्रीम तलावांमध्ये करण्याकडे कल वाढत असला तरी आता त्यापुढे एक पाऊल जाण्याची गरज पर्यावरणस्नेहीना वाटत आहे. कृत्रीम तलावांवरील खर्च तसेच पर्यावरणस्नेहाचा अधिक चांगला पर्याय निवडून, कृत्रिम तलावांच्या चळवळीचा श्रीगणेशा करणाऱ्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ तसेच चेंबूरच्या ‘पेस्तम सागर सिटिझन फोरम’च्या सदस्यांनी आता घरच्या घरीच मूर्तीचे विसर्जन करण्यास सुरुवात केली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थाथ पीओपीच्या मूर्तीमुळे विसर्जनस्थळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रीम तलावांचा पर्याय पुढे आला. डॉ. शुभा राऊळ यांनी २००६ मध्ये त्यांच्या दहिसर मतदारसंघात प्रथम कृत्रीम तलावाचा प्रयोग केला. महापौर झाल्यावर डॉ. राऊळ यांनी महापौर बंगल्यात कृत्रीम तलाव केल्यावर विसर्जनासाठी गणेशभक्तांची रीघ लागली आणि मग अनेक ठिकाणी कृत्रीम तलाव दिसू लागले. मात्र कृत्रीम तलावांना समाजमान्यता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉ. शुभा राऊळ यांचे मत वेगळे आहे. पीओपी मूर्तीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आणि पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी पहिले पाऊल म्हणून कृत्रीम तलावांचा पर्याय स्वीकारला होता. शहरात दरवर्षी वाढत असलेली मूर्तीसंख्या पाहता मातीच्या लहान मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन हेच अधिक योग्य पाऊल आहे, असे डॉ. राऊळ यांचे म्हणणे आहे.
चेंबूर येथील पेस्तम सागर सिटिझन फोरमने २००२ मध्ये स्वत:च्या सोसायटीपुरता कृत्रीम विहिरींचा पर्याय सुरू केला. सुरक्षितता, स्वच्छता व पर्यावरणस्नेही असल्याने अल्पावधीतच त्याला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फोरमनेही कृत्रीम विहिरींची संख्या वाढवत नेली. ‘पीओपी मूर्ती विरघळत नाही, हे दाखवण्याचा मार्ग म्हणून पाण्याच्या टाकीतील विसर्जनाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र मूर्तीची संख्या वर्षांगणिक वाढत गेली. त्यानंतर मात्र या खर्चिक पर्यायापेक्षा घरच्या घरी विसर्जनाचा मार्ग आम्ही स्वीकारला. आता सोसायटीतील इतर सदस्यही घरीच मूर्ती विसर्जित करतात’, असे शीतल सांगोले म्हणाल्या.
कृत्रीम तलावांसाठी एक कोटींहून अधिक  खर्च
कृत्रीम तलावासाठी खणावा लागणारा खड्डा, त्यातील प्लास्टिक, सजावट, दर दिवशी बदलावे लागणारे पाणी, विसर्जनासाठीचे स्वयंसेवक, विद्युत रोषणाई, सुरक्षा आदीसाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च येतो. पूर्वी नगरसेवक निधीतून केले जाणारे कृत्रीम तलाव आता महापालिकेच्या निधीतून केले जातात. शहरात २७ ठिकाणी कृत्रीम तलाव करण्यात आले आहेत. त्यांचा खर्च तब्बल एक कोटी रुपयांवर गेला आहे.
कृत्रिम तलावातील मूर्तीविसर्जन
(एकूण मूर्तीविसर्जन)
२००९     –     ८,६०० (१,८७,५०६)
२०१०     –     १२,२८६ (१,८४,९८१)
२०११     –     १३,८२९  (१,९१,५४७)
२०१२     –      १६,२७६ (१,९९,६९४)
२०१३     –     १९,८८१ (२,०७,७५२)