शहरातील खड्डे गणेशोत्सवापूर्वीच बुजविले जातील असे आश्वासन उरण नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले होते. गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असतानादेखील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे यंदाही गणरायाच्या आगमनाला नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे विघ्न कायम आहे.
खड्डे ही उरण शहरातील नेहमीचीच डोकेदुखी बनली आहे. दरवर्षी हे खड्डे बुजविण्याचे व रस्तेदुरुस्तीचे काम होऊनही त्याच ठिकाणी पुन:पुन्हा खड्डे कसे पडतात, असा प्रश्न उरणमधील नागरिक महेश घरत यांनी केला आहे. खड्डे बुजविताना वापरण्यात येणारे साहित्य अपुरे असल्याने तसेच खड्डे व्यवस्थित न भरल्याने ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फटका मात्र ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,महिला तसेच वाहनचालकांना बसत आहे. त्याचप्रमाणे खड्डे न बुजविल्याने वाहतूक कोंडीतही भर पडली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील खड्डे बुजविण्याची तयारी करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने दोन दिवस शहरातून गणेशमूर्ती नेताना सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना कसरत करावी लागल्याचे मत भारत पाटील यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी व उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांना विचारणा केली असता खड्डे बुजविण्यासाठी खड्डय़ात ग्रीड टाकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.