आलिशान गाडय़ांमधून येऊन मध्यमवर्गीयांची बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखा १२ च्या पथकाने छडा लावला आहे. या टोळीकडून मुंबईतील २७ घरफोडय़ांमध्ये चोरलेला लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मुंबई उपनगरांत लागोपाठ घरफोडय़ा होत होत्या. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. गुन्हे शाखा १२ च्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव आणि पोलीस अंमलदार सचिन सावंत यांना घरफोड्या करणाऱ्या एका टोळीची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून टोळीचा म्होरक्या अली मिर्झा बेग उर्फ अज्जू (४९) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून घरफोडीच्या सुरस कथा बाहेर आल्या आणि त्याच्या टोळीची धरपकड सुरू झाली.
आलिशान गाडय़ांचा वापर
या टोळीच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना कक्ष १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले की, ही टोळी होंडा सिटी गाडीतून यायची. ज्या इमारतीत सीसीटीव्ही नाही आणि सुरक्षा रक्षक नाही अशा इमारती ते हेरायचे. आलिशान गाडीतून इमारतीत जायचे. बेल वाजवून कुठले घर बंद आहे याची खात्री करायचे आणि बंद घर सापडले की काही मिनिटात कुलूप तोडून घरात प्रवेश करायचे. या टोळीचा म्होरक्या अली बेग याने पुण्यात १२२ घरफोडय़ा केल्या होत्या. मुंबईत त्यांनी केलेल्या २७ घरफोडय़ातील लुटलेला सुमारे ५४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीतील कैलाश मोरे (३२), दीपक मिश्रा ( २२), संजय कामडी (२५) या तिघांसह चोरीचा ऐवज विकत घेणारा सोनार विनोद संघवी (३८) आणि अली बेग याची बहीण मेहरूनिस्सा शादाब यांनाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा १२ च्या पथकातील पोलीस निरीक्षक रवी अडाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर, मनोहर दळवी, उमेश गौड आदींच्या पथकाने या टोळीला अटक केली.