महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या ओल्या कचऱ्यामुळे या परिसरात  दरुगधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयाच्या आवारात असलेले भंगार प्रशासनाने एका ठेकेदाराला विकले. चार महिन्यांच्या पावसात हे भंगार कुजले होते. लाकूड, हातगाडय़ा, लोखंड, टायर, लाकडी फळ्या स्वरूपात असलेल्या या फळ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे तुकडे अडकलेले होते. भंगार ठेकेदाराने आपल्या उपयोगी असलेले भंगार महापालिकेच्या आवारातून उचलले. या भंगारामध्ये ज्या कुजलेल्या पिशव्या, टायर्स, कुजलेले लाकूड होते ते त्याने पालिकेच्या आवारात ढीग करून ठेवले आहे. या कचऱ्याची दररोज सकाळी आणि संध्याकाळी या भागात दरुगधी पसरते. हा कचऱ्याचा ढीग पालिकेच्या आवारात पडूनही पालिकेच्या ग आणि फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांना, घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना हा कचरा उचलून न्यावासा वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.