ज्या माळावर एरवी जनावरांशिवाय कुणीही फिरकत नव्हते त्या गारवाडच्या सुळकी तुकाईच्या डोंगरद-यांमधून झाल्या देशी-विदेशी मोटारींच्या साहसी कसरती. निमित्त होते फ्र टेली ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेचे!
गारवाड (ता. माळशिरस) येथील सुळकी तुकाई डोंगर म्हणजे सदैव निर्मनुष्य परिसर. नुकत्याच झालेल्या पावसाने संपूर्ण परिसर हिरवागार झालेला. छोटे-मोठे ओहोळ खळाळणारे. अशा या परिसरात साता-याच्या मराठा व्हेंचर, अकलूजचा शिवकीर्ती युवा मंच व फट्रेली वाईन्सच्या वतीने ही मोटारींची साहसी स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी परिसरातील वळणावळणाच्या, चढउताराच्या २० किलोमीटरच्या अंतरात विविध ‘ट्रॅक’ तयार केले होते. जागोजागी अडीच-तीन फूट खोलीचे चिखलाचे खड्डे तयार केले होते. चिखल-खड्डय़ाचे ‘ट्रॅक’ लगोलग अवघड वळणे, डोंगराची खडी चढण या सा-या साहसांना तोंड देत या मोटारी या डोंगर-द-यातून फिरल्या आणि उपस्थितांनी तोंडात बोटे घातली. यातील प्रत्येक खडय़ा- वळणावर वरखाली होणारी, दरीत घसरणारी, उलटणारी मोटार पाहिली, की पाहणा-यांच्याच काळजाचा ठोका चुकत होता. या सा-या दिव्यातूनही त्या मोटारींने हे साहस पूर्ण केले आणि जमलेल्या हजारो दर्शकांनी टाळय़ांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
या स्पर्धेसाठी जि. प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील उपस्थित होते.