रंगभूमीवर एक काळ गाजविलेले कलाकार वयोपरत्वे विविध कार्यक्रम, पुरस्कार वितरण सोहळे अशा समारंभांना उपस्थित राहू शकत नाहीत. या जुन्या कलाकारांच्या भेटीगाठी होणे, काही ना काही निमित्ताने सर्वानी एकत्र येणे, आठवणींच्या जुन्या लडी उलगडणे तसे दुरापास्तच झालेले असते. त्यामुळे या मंडळींना एकत्र आणून त्यांचे आपापसात ‘हितगुज’ होण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद आणि मराठी नाटय़ कलाकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी रमेश देव, सीमा देव, नयना आपटे, रजनी जोशी, गंगाराम गवाणकर, लीलाधर कांबळी, अरविंद पिळगावकर, अशोक पत्की, राजा मयेकर, आशालता वाबगावकर, बाळ कर्वे, बाबा पार्सेकर, सुहास जोशी, ज्योती चांदेकर, माया जाधव, अशोक समेळ, सतीश पुळेकर, रमेश भाटकर, वामन तावडे, विवेक लागू आणि अन्य असे साठहून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत.
जुन्या रंगकर्मीशी संपर्क साधून त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. कोणाशी संपर्क करणे राहून गेले असेल तरी त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी गीता सोमण (९९२०९९९३१०)/भारत तांडेल (९९८७०१८८८९)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी नाटय़ कलाकार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कब्रे यांनी केले आहे. या कार्यक्रमात कलाकारांना आपले मनोगत व्यक्त करता येणार आहे.
ज्येष्ठ कलाकारांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, अशी आयोजकांची अपेक्षा आहे.
या वेळी उपस्थित कलाकारांपैकी काही जण आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.