नगरच्या एमआयडीसीमधील लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये व्यवस्थापन व कामगारांच्या भारतीय कामगार सेना या संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये आज वेतनवाढीचा करार झाला. त्यासाठी गेली २० महिने बाजुंनी चर्चा सुरु होती. करारानुसार कामगारांना दरमहा कमीत कमी ३ हजार ५६४ रुपये ते जास्तीत जास्त ७ हजार ५०० रुपयांची प्रत्यक्ष वाढ मिळणार आहे. समाधानकारक वेतनवाढीबद्दल कामगारांनी गुलाल उधळुन व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी प्रसिद्ध निवेदक व शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते.
एलअँडटीच्या येथील कारखान्यातील संघटनेचे सरचिटणीस सुभाष दराडे यांनी या कराराची माहिती दिली. करार १ ऑक्टोबर २०११ ते ३० सप्टेंबर २०१५ या चार वर्षांच्या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्याचा लाभ ४९५ कायम कामगारांना मिळणार आहे. त्यामध्ये सुमारे १०० महिला कामगार आहेत. कामगारांना गेल्या १९ महिन्यांचा करारातील फरकही मिळणार आहे. कंपनीने ‘जीपीपीएस’ ही उत्पादनाशी निगडीत वाढीची योजनाही लागु केली आहे, त्यामुळे कंपनीच्या उलाढालीनुसार कामगारांना अप्रत्यक्ष वाढ त्यापेक्षा अधिक मिळेल.
करारावर सह्य़ा झाल्यानंतर झालेल्या संघटनेच्या सभेत कंपनीचे सरव्यवस्थापक के. के. शुक्ला, भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक व बांदेकर यांची भाषणे झाली व कराराची माहिती देण्यात आली. करारावर शुक्ला, महाडिक यांच्याशिवाय कंपनीचे सहसरव्यस्थापक अरविंद पारगावकर, संदिप महाजन व मेनन (कार्मिक, मुंबई), कार्मिक व्यवस्थापक नागेश आढाव, देवेंद्र अकोलकर, भांबारकर तसेच संघटनेचे सचिव विश्वनाथ रणदिवे, उपाध्यक्ष भरत भोसले व अशोक वाईणकर, येथील युनिटचे अध्यक्ष किशोर परबते, सरचिटणीस दराडे, रमेश आमले, जगदिश नेवे, कैलास कोकराळे, साहेबराव गुंजाळ, सिदप पाटील, ज्ञानेश्वर खोडके तसेच सहायक कामगार आयुक्त वाघ आदींच्या सह्य़ा आहेत.