संक्रांतीचे वाण लुटताना सुवासिनी प्लॅस्टिकच्या वस्तू भेट देत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास हातभार लागतो. या पाश्र्वभूमीवर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी येथील एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लबने सुवासिनींनी कापडी पिशव्यांचा वाण लुटावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जागृती करण्यास सुरूवात केली आहे. त्याला यंदा उत्तम प्रतिसाद लाभला असून, संक्रांतीला १० हजार कापडी पिशव्या सुवासिनींनी भेट स्वरूपात देऊ केल्या आहेत.
एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्लबच्या या उपक्रमात पहिल्या वर्षी चार हजार, दुसऱ्या वर्षी साडेआठ हजार महिलांना पिशव्या वाटण्यात आल्या. यंदा दहा हजार पिशव्या वटण्यात आल्या आहेत. त्याचा प्रारंभ नगरसेविका सुरेखा पालकर यांच्याहस्ते करण्यात आला. पालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अरूणा जाधव, उपक्रम प्रमुख विजया कापसे, रजनी पाटील, सुप्रिया सोनटक्के, सरोजिनी मोहिते, पौर्णिमा जाधव, उषाताई भिसे आदी भगिनींची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी कालिकादेवी पतसंस्था, प्रियांका कॅप मार्ट, राजेंद्रसुरी पतसंस्था, पाश्र्वनाथ पतसंस्था, महिला मर्चंट, भूमी नागरी पतसंस्था आदी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे.