मुंबईकर जनतेची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी वाडा तालुक्यात पिंजाळ व गारगाई हे दोन नवीन प्रकल्प होऊ घातले जात आहेत. काही दिवसांतच मुंबई महापालिका या दोन्ही धरणांचे काम हाती घेणार आहे. या धरणातील पाणीसाठय़ांपैकी निम्मे पाणी वाडा व विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बुधवारी येथे केली.
कुणबी सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना विश्वनाथ पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. धरणातील निम्मा पाणी साठा स्थानिकांना देण्याबाबतचे स्पष्ट आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धरणांचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रस्ते, धरण, गॅसवाहिनी, विद्युत टॉवर या परिसरातील जमिनी मोठय़ा प्रमाणात ताब्यात घेतल्या जात आहेत. तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांमुळे या परिसरातील पर्यावरण धोक्यात येत आहे. वाडा तालुक्यावरील या संकटाबाबत सत्ताधारी व विरोधक उदासीन असल्याबद्दल कुणबी सेनेने खेद व्यक्त केला.
वाडा-भिवंडी-मनोर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना सुरू केलेली टोलवसुली बंद करावी, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्या रस्त्याची तसेच सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद-बांधकाम विभागाने केलेल्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.