गोंडवाना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदावरून डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी तडकाफडकी डॉ. मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे, अशी चांदेकरांची ओळख  असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सक्रीय पाराशर-मिश्रा गटाला धक्का बसला आहे.
स्थापनेपासूनच वादातीत ठरलेल्या गोंडवाना विद्यापीठातल्या प्रभारी कुलगुरूपदाच्या नियुक्तीवरून आता नवे वादळ निर्माण झाले आहे. प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या हाती गोंडवाना विद्यापीठाची सुत्रे सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढसुद्धा देण्यात आली. हा कालावधी लोटून दहा दिवस उलटल्यावर त्यांच्याकडून कुलगुरूपदाची सुत्रे काढून घेण्यात आली. आज राज्यपाल कार्यालयातून डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या नियुक्तीचे पत्र आले. या अचानक बदलामुळे शैक्षणिक वर्तुळात आता विविध चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. चांदेकर यांनी काम पाहिले आहे. या आधी ते वर्धमाननगरातील व्हीएमव्ही महाविद्यालयात प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशीसुद्धा त्यांचा संबंध होता. संघाशी जवळीक असणारे डॉ. चांदेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत ते होते, पण त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागली नाही.
एकीकडे डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांचे वेदप्रकाश मिश्रा यांच्याशी असलेले नातेसंबंध आणि गौरीशंकर पाराशर यांच्याशी असलेली त्यांची जवळीक त्यांच्या उचलबांगडीसाठी कारणीभूत मानली जात आहे. सध्या विद्यापीठात मिश्रा आणि पाराशरविरोधी लाट आहे. या लाटेचा फटका दीक्षितांच्या उचलबांगडीत आणि त्यांच्या जागी चांदेकरांच्या पूनर्वसनात झाल्याची चर्चासुद्धा विद्यापीठ वर्तुळात आता रंगू लागली आहे. गोंडवाना विद्यापीठाचा कुलगुरू हा त्याच भागातला असावा आणि आदिवासी असावा, अशी मागणी या विद्यापीठाच्या स्थापनेपासून केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने पहिले कुलगुरू म्हणून डॉ. विजय आईंचवार यांची नेमणूक केली होती. त्यांची मुदत संपल्यानंतर चंद्रपूरचेच दीक्षित यांना नेमण्यात आले.