समाजात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. कुठेतरी गर्भपात करण्यास भाग पाडणारी सासू, दवाखान्यातील परिचारिका व गर्भपात करणारी डॉक्टर ही स्त्रीच असते. त्यामुळे स्त्रियांची मानसिकता बदलण्याची गरज भासू लागली आहे. खरे तर कायदा पाळणारा समाज घडविण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, माणिकचंद पहाडे महाविद्यालय व सेंट मोनिका इंग्लिश स्कूल यांच्या वतीने आठवे विधी साक्षरता शिबिर झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. राजेंद्र देशमुख होते. न्या. समिना सय्यद, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, तहसीलदार महादेव किरवले उपस्थित होते. न्या. सय्यद म्हणाल्या की, मुलींना शिक्षण दिले तर दोन कुटुंबे साक्षर होतात. शालेय शिक्षणासोबत मुलींना स्वसंरक्षणार्थ ज्युदो-कराटेचेही शिक्षण दिले गेले पाहिजे, जेणेकरून समाजातील वाढत्या अत्याचारांविरुद्ध लढा देण्यास त्या समर्थ होतील. भाऊसाहेब पाटील यांनी मुलांना घडविण्यामध्ये शाळा व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.  प्रास्ताविक प्रा. दिनेश कोलते यांनी, तर सूत्रसंचालन प्रदीप दहिवाळ यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबंदी, दारुबंदी अशा विषयांवर पथनाटय़े सादर केली.