पनवेलमध्ये बेकायदा शस्त्र खरेदी-विक्रीचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. या धंद्यात प्रतिष्ठित आणि सुशिक्षित कुटुंबातील मुलेही अडकल्याचा एक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी खारघर येथून तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत हे तरुण सरकारी कर्मचाऱ्यांची मुले असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांना धक्का बसला आहे.
पनवेल तालुक्यात खारघर येथे मध्यरात्री सेक्टर ७ येथील निळकंठ स्वीट मार्ट या दुकानासमोर एका दुचाकीवर साधारण २० ते २२ वयोगटातील तीन तरुण संशयास्पदरीत्या पोलिसांना आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे सापडली. संकेत गायकवाड, सागर जाधव व आकाश जाधव अशी त्यांची नावे असून हे तिघेही मित्र आहेत. त्यांचे शिक्षण १०वी ते १२पर्यंत झाले आहे. बेकायदा शस्त्र खरेदी-विक्रीतून चांगले पैसे मिळतील या लालसेपोटी त्यांनी हा मार्ग निवडला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. शस्त्र खरेदीनंतर काही तासांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद होडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मुलांचे पिता पोलीस, कस्टम, बेस्ट या सरकारी सेवेत आहेत. हे तिघेही कळंबोली येथे फुटबॉल खेळायला जायचे. तेथे त्यांची बेकायदा शस्त्र विक्री करणाऱ्या व्यक्तीशी मैत्री झाली आणि त्यातून या तिघांनीही बेकायदा शस्त्र खरेदी-विक्री करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी शस्त्र व जिवंत काडतुसे विकत घेण्यासाठी तिघांनी काही रक्कम जमवून त्या मित्राला गाठले आणि त्याच्याकडून गावठी कट्टा, काडतुसे विकत घेऊन ते खारघरमध्ये आले. खारघरमध्ये हे तिघेही ही शस्त्रात्रे अधिक रकमेने विकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ‘महामुंबई’ वृत्तान्तला दिली. सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.